
संपूर्ण जगाचा प्रवास बाईकवर करण्याचं स्वप्न घेऊन निघालेल्या महाराष्ट्रातील मोटारसायकल स्वाराची बाईक युनायटेड किंगडममध्ये (यूके) चोरीला गेली. यानंतर त्याच्यावर जगभरातून मदतीचा वर्षाव झाला.
मिळालेल्या या पाठिंब्यामुळे ‘माझे विचार आणि दृष्टीकोन पूर्णपणे बदलले’ असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
या बाईकवर या दुचाकीस्वाराने तब्बल 15,000 मैल (24,140 कि.मी.) प्रवास केला होता.
योगेश आलेकरी या महाराष्ट्रातील युवकाची बाईक 28 ऑगस्टला नॉटिंगममधील वॉलेटन पार्कमध्ये पार्क करण्यात आली होती. त्यावेळी त्याची बाईक चोरीला गेली होती.
दरम्यान, योगेशला या काळात अनेकांकडून कपडे, नवीन मोटारसायकल अशा मदतीच्या अनेक ऑफर मिळाल्या. यूके, भारत आणि बाईक चालवणाऱ्या समुदायाकडून मिळालेल्या मदतीचं त्यानं कौतुक केलं आहे.
लोकांच्या मदतीमुळे दृष्टीकोन बदलला
“मला खरंच याचं खूप कौतुक वाटतं,” असं तो म्हणाला.
” त्यांनी (शुभचिंतक) माझा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. मला भारत, यूके आणि संपूर्ण बाईकर्स समुदायाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.”
तो म्हणाला, “ब्रिटनमधील बाईकर्स आणि ब्रिटिश नागरिकांकडून मला खूप मेसेजस आले. ते म्हणतात, ‘आम्ही तुझ्यासोबत आहोत, तुला नक्की मदत करू’.”
बाईक चोरीची बातमी प्रसिद्ध झाल्यापासून पाठिंब्याचे असंख्य मेसेजस येत असल्याचे योगेश आलेकरीने सांगितलं.
“लोकांमध्ये खरंच मानवता आहे,” असं तो म्हणाला.
तो म्हणाला, “अनेक लोकांनी मला रायडिंग गिअरची ऑफर केली. काहींनी तर त्यांची स्वतःच्या मोटारसायकलही ऑफर केली आहे.”
टीव्ही प्रॉडक्शनही मदतीसाठी पुढे
शुभचिंतकांमध्ये लाँग वे होम या टीव्ही मालिकेच्या प्रॉडक्शन कंपनीचाही समावेश होता. या मालिकेत इवान मॅकग्रेगर हा अभिनेता आहे आणि टीव्ही होस्ट चार्ली बुरमन यांनी ती सादर केली आहे.
योगेशच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टला प्रतिसाद देताना लाँग वे टीव्ही अकाउंटने त्याला मोटारसायकल देण्याची ऑफर केली.
“नॉटिंगममध्ये तुझी बाईक चोरी झाल्याचं ऐकून खूप वाईट वाटलं,” असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
त्यांनी पुढं लिहिलं की, “आमच्याकडे एक केटीएम आहे, जी आम्ही मागच्या मालिकेच्या शूटिंगसाठी वापरली होती. तुला उपयोगी पडणार असेल तर आम्ही ती तुला द्यायला तयार आहोत.”
पोलीस त्याची बाईक परत मिळवून देतात का हे पाहून, त्यानंतरच नवी गाडी घेण्याच्या ऑफरबाबत विचार करू, असं योगेश म्हणाला आहे.
तो पुढं म्हणाला, “मी या मोटारसायकलशी खूप भावनिकरित्या जोडला गेलो आहे. फक्त माझी मोटारसायकल परत द्या. मला केवळ शांत आयुष्य हवं आहे, पण सध्या मी खूप त्रास सहन करतोय.”
Yogesh Alekariजगभ्रमंती सुरू करण्यापूर्वी एप्रिलमध्ये ही बाईक घेतली होती आणि त्यानंतर 20 हजार पाऊंड खर्च केले होते, असं योगेशनं सांगितलं.
नॉटिंगमशायर पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, अधिकारी अजूनही मोठ्या प्रमाणावर तपास करत आहेत, परंतु अद्याप कोणालाही अटक झालेली नाही आणि बाईकही सापडलेली नाही.
महाराष्ट्रियन योगेश आलेकरीने 1 मे रोजी मुंबईहून आपल्या मोटारसायकल चॅलेंजची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने आशिया आणि युरोपमधील 17 पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला होता.
योगेशचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. तो त्याच्या प्रवासाची सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यानं एका पोस्टमध्ये ही चोरी ‘खूप वेदनादायी’ होती आणि त्यामुळे तो ‘खूप दुखावला’ असल्याचं म्हटलं होतं.
योगेशच्या अनेक पोस्ट या मराठीत देखील आहेत. आतापर्यंत 47 देशांना भेट दिल्याचे त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बायोमध्ये लिहिलं आहे.
योगेश UK तून जाणार होता आफ्रिकेत
योगेशने आतापर्यंत इराण, नेपाळ, चीन, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानसारख्या देशांमधून बाईकवर प्रवास केला होता. त्यानंतर युरोपमध्ये जाऊन त्यानं जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि फ्रान्ससह अनेक देशांना भेट दिली होती.
यूकेतून त्यानं आफ्रिकेतून जाण्याचं नियोजन केलं होतं. परंतु, तो आता UKमध्ये अडकला आहे. त्याच्याकडे फक्त कपडेच राहिले आहेत. उरलेलं त्याचं सर्व सामान बाईकबरोबर चोरीला गेलं आहे.
आता पुढं काय करायचं, हे सध्या ठरवत असल्याचं योगेशनं म्हटलं आहे.
योगेश म्हणाला की,”मी नॉटिंगममध्ये एका बाइकर इव्हेंटसाठी थांबलो होतो आणि ऑक्सफर्डकडे निघण्याचा तयारीत होतो. मी इथं थांबलो आणि वॉलेटन पार्कमध्ये माझी बाईक पार्क केली.”
मी बाईक लॉक केली होती आणि तेथे बरेच लोक आणि खेळणारी लहान मुलं होती, त्यामुळे मला वाटलं की, ही जागा सुरक्षित आहे, असं योगेशने म्हटलं.
नाश्ता करून परतेपर्यंत बाईक चोरीला
मी रस्ता पार करून नाश्ता करण्यासाठी गेलो, आणि एका तासाच्या आत परतही आलो पण सर्व काही गायब झालं होतं, असं योगेश म्हणाला.
पार्कमध्ये असलेल्या एका व्यक्तीने घेतलेल्या व्हीडिओत योगेश आलेकरीची बाईक मोपेड स्कूटरवर आलेले काही माणसं पळवून नेताना दिसले.
पूर्णवेळ कंटेंट क्रिएटर असलेल्या योगेशचे 1 लाख 80 हजारपेक्षा जास्त इन्स्टाग्राम आणि सुमारे 16 हजार फेसबुक फॉलोअर्स आहेत. चोरी झालेल्या वस्तूंची किंमत 15 हजार पाऊंडपेक्षा (अंदाजे 15 लाख रुपये) जास्त असल्याचे त्यानं सांगितलं.
त्यानं सांगितलं की, त्यांच्या बाईकवरील स्टोरेज बॉक्समध्ये त्यांचा मॅकबुक लॅपटॉप, एक अतिरिक्त मोबाइल, दोन कॅमेरे, रोख रक्कम आणि पासपोर्ट तसेच कपड्यांसारख्या इतर वस्तूही होत्या.
‘मी सर्व काही गमावून बसलो’
मला प्रचंड धक्का बसला आहे. जे घडलं ते समजल्यावर मी खचलो आणि रडू लागलो, असं त्यानं पुढं सांगितलं.
त्यांनी माझी बाईक चोरली, पण ती फक्त बाईक नव्हती. ते माझं घर, माझं स्वप्न आणि प्रवासी म्हणून माझं सगळं काही होतं, असं योगेश म्हणाला.
हे कसं घडू शकतं? अचानक मी सर्व काही गमावलं आहे.
Photo caption- जगभ्रमंती सुरू करण्यापूर्वी एप्रिलमध्ये ही बाईक घेतली होती आणि त्यानंतर 20 हजार पाऊंड खर्च केले होते, असं योगेशनं सांगितलं.
अभिनेता इवान मॅकग्रेगर आणि टीव्ही होस्ट चार्ली बुरमन यांच्या लाँग वे होम या टीव्ही मालिकेच्या प्रॉडक्शन कंपनीने योगेशशी संपर्क साधला आहे.
योगेश म्हणाला, “मी पोलिसांना कॉल केला, पण ते फार विचित्र वाटलं कारण त्यांनी फक्त मला एक गुन्हा क्रमांकच (क्राइम नंबर) दिला.
त्यांनी मला सांगितलं की, ते मला परत कॉल करतील आणि मी पार्कमध्ये त्यांची वाट पाहत होतो, पण त्यांनी कधीच कॉल केला नाही.
त्यानं पुढे सांगितलं की, “मला स्पेनहून मोरोक्कोला जायचं होतं, नंतर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे, केपटाऊनपासून केनियापर्यंत प्रवास करायचा आणि नंतर भारतात परत जायचं, असं नियोजन होतं.
(विराज सोनी यांचं अतिरिक्त वार्तांकन)