
अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ !
करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कॉल करून दम दिला. कारवाई थांबवली. पण, ज्या व्यक्तीने अजित पवारांना कॉल केला होता, त्याच्यामुळे हे प्रकरण आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
या व्यक्तीचे नाव बाबा जगताप असून, ते संरपच असल्याचे समोर आले आहे. ग्राम पंचायत कार्यालयात ते गांजा सेवन करत असल्याचा दावा शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच. याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं. दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली.”
“७० कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे मागितली, तर…”
“अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसांना तरी तोंड दाखवायला जागा राहील का ? किरीटचं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे”, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना डिवचलं.
जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनो न् महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर केली आहे.
अजित पवारांना कॉल केला अन् अंजली कृष्णा यांना दिला मोबाईल
करमाळ्यातील कुर्डू गावात घडलेल्या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार टीकेचे धनी ठरले. अजित पवारांनी याबद्दल खुलासा करत पडदा टाकला. पण, बाबा जगताप यांचा नवा व्हिडीओ समोर आल्याने प्रकरणाला नवी फोडणी मिळाली आहे.
अंजली कृष्णा यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीच या व्हिडीओने पंचाईत झाली आहे. जो व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आहे, त्यात बाबा जगताप चिलीमद्वारे धूम्रपान करताना दिसत आहे.