
मोठं कारण आलं समोर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभरापूर्वीच जपानच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची भेट घेत दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत विश्वास व्यक्त केला होता.
त्यानंतर आता जपानमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पंतप्रधान इशिबा यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे जपानमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यामागचे कारणही समोर आले आहे. सत्ताधाऱी लिबरल डेमोक्रेटिक पक्षामध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही फूट रोखण्यासाठी इशिबा यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. जुलै महिन्यांत झालेल्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता.
पराभवानंतर पक्षांतर्गत नेतृत्वामध्ये बदल करण्याची मोठी मागणी होत होती. पंतप्रधानांची सरकारवरील पकड कमी झाल्याचा दावा केला जात होता. मागील काही महिन्यांपासून अमेरिकेसोबत जपानची टेरिफच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. हा मुद्दा जपानमध्ये कळीचा बनला होता. अमेरिकेने सुरूवातीला 25 टक्के टेरिफ लादले होते. त्यानंतर ते 15 टक्क्यांपर्यंत कमी केले होते.
यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच जपानच्या दौऱ्यावर गेले होते. टेरिफचा मुद्दा तापलेला असतानाच जपानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. जपानच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण 248 जागा आहेत. त्यापैकी निम्म्या जागांसाठी जुलै महिन्यात मतदान झाले होते. सत्ताधारी पक्षाला केवळ 47 जागा मिळाल्या होत्या. तर मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत या पक्षाने सर्वात खराब कामगिरी केली होती.
इशिबा सरकार अविश्वास प्रस्तावाची चर्चा आणि पक्षांतर्गत नेतृत्व बदलाच्या चर्चेमुळे घेरले गेले होते. सातत्याने ही मागणी जोर धरू लागल्याने इशिबा यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे. मात्र, अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेमुळे ते पद सोडण्यास तयार नव्हते. तसे संकेतही त्यांनी दिले होते. पंतप्रधान मोदींचा जपान दौराही याचदरम्यान होता.
जपानच्या पंतप्रधान पदाचा इशिबा यांनी राजीनामा दिल्यामुळे आता नवे पंतप्रधान कोण असणार, याचीही उत्सुकता वाढली आहे. सध्या जागतिक पातळीवर टेरिफ वॉर तसेच विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विविध देशांच्या प्रमुखांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधानपदाबाबत तातडीने निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.