
भारत-अमेरिकमधील व्यापाराला पुन्हा गती मिळणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पहाटे केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून भारताशी पुन्हा एकदा व्यापाराची चर्चा आणि वाटाघाटी करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचेही ते म्हणाले. या पोस्टनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही देशांचे पथक लवकरच व्यापार करारासंदर्भात चर्चा करेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे मित्र असून ते नैसर्गिक भागीदार आहेत आणि या दोन देशांच्या सहकार्याने भविष्यातील अमर्याद क्षमता उघडण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, ‘भारत आणि अमेरिका जवळचे मित्र असून ते नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्यातील व्यापार वाटाघाटीच्या चर्चेतून भारत-अमेरिकेमधील भागीदारीची अमर्याद क्षमता निर्माण होईल, असा मला विश्वास आहे. आमचे पथक लवकरच ही चर्चा पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. मीदेखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. आम्ही आमच्या दोन्ही देशांतील लोकांसाठी उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करू.’
तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश व्यापारी अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू ठेवणार आहेत.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारत-अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटीवर चर्चा करण्यासाठी राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पथक पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला जात आहे. त्यानंतर अमेरिकन पथकाशी चर्चा पुन्हा एकदा सुरू होईल, असे संकेत मिळत आहेत.