
कुणाचा जोरदार हल्ला ?
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी इंडिया आघाडी तसेच एनडीएकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती.
यासाठी काल मतदान घेण्यात आले. राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. यावेळी मतमोजणीनुसार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना एकूण 300 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. या निकालानुसार बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढता-ओढता राऊतांचा लंगोट सुटला आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाने संजय राऊत यांच्या दाव्यांची हवा काढली. संजय राऊत सातत्याने दावा करत होते की, एनडीए आणि यूपीए यांच्यात फक्त ४० मतांचा फरक आहे. पण, निकाल पाहता हा फरक जवळपास १५० मतांचा होता. विशेष म्हणजे, विरोधी पक्षातील खासदारांनीच आपल्या नेतृत्वावर विश्वास न ठेवता क्रॉस व्होटिंग केले आणि एनडीएला महाराष्ट्रातून सर्वाधिक साथ मिळाली. यामुळे राऊतांचा दावा किती पोकळ होता, हे सिद्ध झाले, असे नवनाथ बन यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास
संजय राऊतांना देवेंद्रजींवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसल्यानंतरही देवेंद्र फडणवीस पुन्हा उभे राहिले. राज्यसभा, विधानपरिषद आणि उपराष्ट्रपती निवडणूक या सर्व निवडणुकांमध्ये फडणवीस यांचे नेतृत्व आणि करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. संजय राऊत यांना हे लक्षात ठेवावे लागेल की, ते स्वतः अर्ध्या मतांच्या आधारावर राज्यसभेवर गेले आहेत आणि पुढील तीन वर्षांत त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही, असेही नवनाथ बन यांनी म्हटले.
कपटी डाव कधीही यशस्वी होणार नाही
देशात नेपाळसारखी अराजकता निर्माण होईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावर नवनाथ बन यांनी सडकून टीका केली. संजय राऊत खंडोजी खोपड्याचे वारसदार आहेत का? तुम्ही महाराष्ट्र आणि देशाच्या विरोधात द्रोह करत आहात का? हा देश स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांचा आहे, येथे कधीही अराजकता माजणार नाही. असे विचार तुमच्या मनात आहेत, तेच ओठांवर आले आहेत. पण तुमचे असे कपटी डाव कधीही यशस्वी होणार नाहीत, असा इशारा नवनाथ बन यांनी दिला.
आजची तरुण पिढी विकासाच्या बाजूने आहे. या देशात आता Gen Z नाही, तर Gen M आहे, म्हणजेच M for Modi. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतदान तरुणाईने मोदींना केले आहे. तरुणांना आगडोंब माजवण्याचं राजकारण रुचत नाही, त्यांना स्थैर्य आणि विकास हवा आहे, असे सांगत नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.