
मनसेच्या रडारवर आला कपिल शर्मा; नेमकं काय प्रकरण ?
बॉलीवूड अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा अडचणीत अडकला आहे. कपिल शर्माच्या कॅफेवर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेता चांगलाच चर्चेत होता, दरम्यान ते प्रकरण शांत झालेलं असताना कपिल शर्मा पुन्हा एकदा वादात सापडला आहे.
आता कपिल मनसेच्या निशाण्यात सापडला आहे. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा आणि त्याच्या शोवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
अमेय खोपकर यांनी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा होण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 30 वर्षांपूर्वी मुंबईचे नाव बदलले गेले तरीही हिंदी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कपिल शर्मा शोमध्ये अजूनही ‘बॉम्बे’ हा शब्द वापरत आहे आणि यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असा आरोप करत खोपकर यांनी इशारा दिला आहे. जर हे बदलले नाही तर शोचे शूटिंग बंद करण्यात येईल अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
कपिल शर्मा यांचा ‘द कपिल शर्मा शो’ हा देशभरात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा केला जातो यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. झी 24 शी बोलताना अमेय खोपकर म्हणाले, “कपिल शर्मा शो असो किंवा हिंदी सिनेमांत असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर असो मुंबईचा उल्लेख जाणूनबुजून ‘बॉम्बे’ असा केला जातो. चेन्नई किंवा बंगळुरू बोलताना मात्र नीट नाव घेतले जाते. हे आम्हाला मान्य नाही.” असे त्यांनी म्हटले आहे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मनसेने कपिल शर्मा शोच्या टीमला पत्र दिले आहे आणि आता ट्विटरवरही इशारा दिला आहे. जर बदल झाला नाही तर शोच्या शूटिंग स्पॉटवर जाऊन आंदोलन करण्यात येईल आणि शूटिंग बंद पाडण्यात येईल, अशी धमकी खोपकर यांनी दिली आहे.
30 वर्षांनंतरही जुने नाव -मुंबई
मुंबईचे नाव ‘बॉम्बे’ वरून ‘मुंबई’ असे बदलले गेले. पण बॉलीवूड चित्रपटांमध्ये अजूनही ‘बॉम्बे’ हा शब्द वापरला जात आहे, असा आरोप अमेय खोपकर यांनी केला आहे. त्यांनी कपिल शर्माला देखील धारेवर धरलं. ते म्हणाले, “15 ते 17 वर्षांपासून कपिल शर्मा मुंबईत राहतो तरी त्याला शहराचे नाव नीट घेता येत नाही का? बाहेरून आलेल्या लोकांना मुंबईत काम मिळते पण शहराचे नाव चुकीचे घेतात. त्यांना लाज वाटली पाहिजे. उद्या आम्ही कपिलला ‘टपिल’ म्हणू तर ते चालेल का? मनसेचा कपिल शर्मा किंवा बॉलीवूडला विरोध नाही, पण शहराच्या नावाचा आदर करावा.” असे त्यांचे म्हणणे आहे.
सेन्सॉर बोर्डावरही केली टीका
अमेय खोपकर यांनी सेन्सॉर बोर्डावरही टीका केली आहे. ते म्हणाले, “मला सेन्सॉर बोर्डाला विचारायचं आहे की तुम्ही इतर वेळेला मराठी चित्रपटांना टार्गेट करता. एका मराठी सिनेमाच्या वेळी नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने विचारला. नामदेव ढसाळ माहिती नाही, अशी लोक तिथे बसली आहे. आणि इथे बॉम्बेचा उल्लेख ज्यावेळेस होतो त्यावेळेस ते आक्षेप घेत नाही. याचा विरोध सर्व स्थरातून झाला पाहिले. सगळ्यांनी लोकांनी याचा विरोध केला पाहिजे.” असे म्हणून त्यानी सेन्सॉर बोर्डावरही टीका केली.