
अंजना कृष्णा यांचे माजी पोलीस आयुक्तांकडून कौतुक; अजित पवारांच्या व्हायरल फोनबाबत दिली प्रतिक्रिया !
महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात होत असलेल्या अवैध उत्खननाविरुद्ध कारवाई करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते.
तेव्हा ठाम भूमिका घेतल्याबद्दल, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे कौतुक केले आहे. ९६ वर्षीय रिबेरो यांनी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी लिहिलेल्या “द ब्रह्मास्त्र अनलीश्ड” या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना अंजना कृष्णा यांचे कौतुक केले.
या प्रकरणी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता रिबेरो म्हणाले की, “मी काही दिवसांपूर्वी एका तरुणीबद्दल बातमी वाचली. हे वाचून मला खूप आनंद झाला. ती इतकी हुशार आहे की, एका उपमुख्यमंत्र्यांनी तिला धमकावण्याचा प्रयत्न केला हे तिने रेकॉर्ड केले.
हे प्रकार खूप सामान्य आहेत, असे म्हणत ज्युलिओ रिबेरो यांनी नमूद केले की, “असा प्रयत्न करणारे ते एकटेच नाहीत आणि मी यावर एक लेख लिहिणार आहे आणि असे प्रयत्न करणाऱ्या काही इतर लोकांचा उल्लेख करणार आहे, परंतु आपल्याला याचा सामना करावा लागेल आणि या मुलीने तो केला आहे.” याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू या गावी मुरूमाच्या उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी अजित पवार म्हणाले होते की, “ऐका, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई थांबवा.
मात्र कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन का नाही केला? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी, “तुमच्यावर कारवाई करू का?” असे म्हटले होते.
विरोधकांकडून टीका
महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. अवैध उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याला कर्तव्यापासून रोखण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यानी केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.