
टॅरिफ, टॅरिफ, टॅरिफ… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे जगभरातील देशांच्या व्यवसायावर थेट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. बहुतांश देशांनी अमेरिकेच्या अटी मान्य केल्या, त्यामुळे ट्रम्प यांचं त्या देशांप्रती मवाळ धोरण होतं.
पण ज्यांनी स्वत:च्या देशाला प्राथमिकता देत ट्रम्प यांच्या नीतींनुसार चालण्यास नकार दिला , त्यांना मात्र जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या विरोधाचा सामना करावा लागला.
गेल्या काही दिवसांत हे स्पष्ट दिसून आलं की भारतही असाच एक देश आहे जो अमेरिकेच्या दबावासमोर झुकला नाही,त्यामुळे भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आला. त्यामुळे भारतावर लावण्यात आलेला टॅरिफ आता एकूण 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण यामुळे अमेरिका-भारतामधील दशकांच्या मैत्रीपूर्ण संबंधांत कटुता आली आहे.
भारतावर टॅरिफ लावण्यावर ठाम असलेल्या ट्रम्प यांनी याच मुद्यावरून पुन्हा स्पष्ट भाष्य केलं आहे. ‘ रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या मुद्यावरून भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावणं हे सोपं काम नव्हतं. पण भारत रशियाकडून तेल खरेदी करत होता, म्हणूनच आम्ही भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलं. यामुळे भारत आणि अमेरिकेत तणावही निर्माण झाला’ असं ट्रम्प म्हणाले. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे विधान केल.
भारत-पाकिस्तान युद्धावरून पुन्हा केला तो दावा
हा निर्णय घेणं खूपच कठीण होतं, त्यामुळे दोन्ही देशांमधील दुरावाही वाढला. पण मी हे याआधीही केलं आहे. मी खूप काही केलं आहे असंही ट्रम्प म्हणाले. रशियाचा मुद्दा हा अमेरिकेचा कमी पण यूरोपचा जास्त असल्याचेही ट्रम्पनी नमूद केलं. मी माझ्या कार्यकाळात अनेक मोठे वाद सोडवले असे म्हणत भारत -पाकिस्तानमधील संघर्ष आपणच थांबवल्याच्या दाव्याचा पुनरुच्चार केला. दुसऱ्या कार्यकाळात अनेक युद्धांवर मी विराम लावला असंही ट्रम्प म्हणाले.
रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत भारताने केला बचाव
तर दुसरीकडे रशिकाडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयाचा भारताने बचाव केला आहे. आम्ही प्रथम आमच्या देशाच्या प्राधान्याकडे पाहू. आम्ही रशियाकडून तेल खरेदी करतो कारण ऊर्जेच्या आमच्या स्वतःच्या गरजा आहेत, आणि बाजारातील परिस्थितीनुसार खरेदी करतो असं भीारताने स्पष्ट केलं.
मात्र भारताने आपल्याकडून तेल आणि तेल उत्पादने खरेदी करावीत अशी अमेरिकेची इच्छा आहे. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये व्यापार चर्चाही सुरू आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांनी स्पष्टपणे नमूद केलं की जोपर्यंत भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणताही व्यापार करार पुढे जाणार नाही. आता यावर दोन्ही देशांमध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.