
माजी मंत्री थोरातांचा विरोधकांना थेट इशारा !
ज्यांचा संबंध नाही, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगमनेर तालुक्यावर रोज नवे संकटे येत आहे. सहकाराला धोका पोहोचविण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात असून सुखी, समृद्ध असलेल्या तालुक्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याने वातावरण बदलले आहे.
खोट्या केसेस टाकल्या जात असून दररोज अनेकांना अटकपूर्व जामीन घ्यावा लागत आहे. आज इतरांना त्रास आहे, उद्या तुम्हालाही होईल, अशा शब्दात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना इशारा दिला.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते, यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख हे होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ड माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग पा. घुले, शंकरराव खेमनर, कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी, फायनान्स मॅनेजर गणपत शिंदे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, दूध संघाची 50 व्या वर्षाकडे होणारी वाटचाल ही मोठी कौतुकास्पद आहे. दूध व्यवसाय अत्यंत कष्टाचा व मेहनतीचा आहे. आपल्या तालुक्यातील नागरिक कष्टाळू आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध व्यवसायाचा तालुक्यात पाया घातला आणि अर्थव्यवस्था सक्षम करण्यात या व्यवसायाने मोठा वाटा उचलला.
राजहंस गुणवत्ता पूर्ण दूध आणि उपपदार्थ हे वैशिष्ट्य राहिले आहे. सहकारामुळे आपली बाजारपेठ समृद्ध आहे. तालुका जपण्यासाठी आता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, दिवसेंदिवस या सहकारी संस्था पुढील प्रश्न बदलत चालले आहे. दूध व्यवसायामध्ये अस्थिरता आहे. तरीही राजहंस दूध संघ हा राज्यात प्रथम क्रमांकाचा असून राज्याच्या कानाकोपऱ्यात दूध पोचवले जात आहे.
रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, यावर्षी दूध संघाने 12 कोटी 51 लाख लिटर दुधाचे संकलन केले असून शेतकऱ्यांकडून 404 कोटींचे दूध खरेदी केले. दूध संघाची आर्थिक उलाढाल ही 551 कोटींची झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध संघ व इतर सहकारी संस्था देशासाठी दिशादर्शक ठरत आहे. दूध संघाने एमडीएफ गोठा, मुरघास असे प्रकल्प राबविले असून त्यांचे राज्यात अनुकरण केले जात आहे.
यावेळी लक्ष्मणराव कुटे, लहानभाऊ गुंजाळ, आर.बी राहणे, इंद्रजीत भाऊ थोरात, अजय फटांगरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, के.के. थोरात, गणपतराव सांगळे, रामदास पा वाघ, सुभाष आहेर, सुनील कडलग, अविनाश सोनवणे, शेळी मेंढी पालन संघाचे डॉ गंगाधर चव्हाण, सौ प्रतिभा जोंधळे, भारत शेठ मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी दूध उत्पादक शेतकरी, दूध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेचे स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर संतोष मांडेकर यांनी आभार मानले.
’आज अनेक नकली दूत पुढे येतायेत’
गोहत्या बंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यावर तातडीने पर्याय व्यवस्था करण्याची मागणी करतानाच, निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले मात्र अनेक नकली जलदूत आता पुढे यायला सुरुवात झाली असल्याची टीका माजी मंत्री थोरात यांनी पालकमंत्री विखे यांचे नाव न घेता केली.