
दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश…
आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एकहाती विजय मिळवला. टॉस वेळी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं जो निर्णय घेतला तोच पॅटर्न मॅच संपल्यावरही दिसला.
ना मॅच फिनिश केल्यावर सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं ना त्याच्यासोबत मैदानात असणारा शिवम दुबे पाकिस्तानी खेळाडूंकडे गेला. भारतीय संघाच्या डग आउटमधूनही कोणी मॅचनंतर मैदानात उतरुन ही औपचारिकता म्हणा किंवा परंपरा म्हणा ते जपण्यासाठी पुढे आले नाही. आम्ही काहीच विसरलेलो नाही, असा स्पष्ट संदेशच टीम इंडियाने दुबईतील सामन्यादरम्यान पाकला दिलाय.
पाक विरुद्ध खेळू नका, विरोध असताना खेळावा लागला सामना
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक यांच्यात पुन्हा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताकडून कारवाईही करण्यात आली. या घटनेनंतर पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळूच नये, अशी मागणी जोर धरत होती. त्यातही भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास उतरला होता. द्विपक्षीय मालिका होणार नाही, पण आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धेसारख्या बहुदेशीय स्पर्धेत पाकिस्तानवर बहिष्कार टाकता येणार नाही. आम्ही सरकारच्या आदेशाचे पालन करतोय, असे म्हणत बीसीसीआयने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळावेच लागणर हे स्पष्ट केले होते.
पाकिस्तानसोबत खेळताना भारतीयांच्या भावना जपण्याचा प्रयत्न
भारत-पाक यांच्यातील सामना हा हायहोल्टेज सामना म्हणून पाहिला जातो. पण पहलगाम येथील हल्ल्यानंतर दुबईच्या मैदानात रंगलेला सामना अधिक संवेदनशील मुद्दा ठरला. या सामन्याला झालेला विरोध लक्षात घेऊन पाक विरुद्ध मैदानात उतरल्यापासून ते सामना संपेपर्यंत टीम इंडियाचा कर्णधार अन् संघातील सर्व सदस्यांनी भारतीयांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. इथं आम्ही फक्त क्रिकेट खेळायला आलोय तुमच्याशी हात मिळवायला नाही, अशी ठाम भूमिका घेत टीम इंडियाने पाकिस्तान खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं.