
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन माजी सभापती, तीन माजी उपनगराध्यक्ष, खरेदी-विक्री संघ, बाजार समितीचे संचालक यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत करून पक्षात अधिकृत प्रवेश दिला.
या वेळी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, मावळ विधानसभा निवडणूकप्रमुख रवींद्र भेगडे, माजी सभापती निवृत्ती शेटे, शांताराम कदम, रवींद्रनाथ दाभाडे, मंडलाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, दत्तात्रय माळी, रघुवीर शेलार, वडगाव शहराध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वाखाली देश आणि राज्याच्या प्रगतीचा नवा अध्याय रचला जातोय. भाजपच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून आज या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
…यांचा झाला पक्षप्रवेश
दरम्यान, प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबूराव वायकर, जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे माजी सभापती अतीश परदेशी, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष नेते रामदास काकडे, उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, माजी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मुऱ्हे, खरेदी-विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले, संचालक बाजीराव वाजे, माजी नगरसेवक अरुण माने, पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त अरुण चव्हाण आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आता मावळ काँग्रेसला माऊली दाभाडेंचाच आधार
तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते पै. चंद्रकांत सातकर यांचे नुकतेच निधन झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा आधार गेल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असताना आज दुसरे नेते रामदास काकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांचाच आधार राहिला आहे.
बापूसाहेब भेगडे यांची अनुपस्थिती; प्रवेश लवकरच !
भाजपमध्ये होणारे प्रवेश हे बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, परंतु या वेळी त्यांच्याच समर्थकांचा प्रवेश झाला. या प्रवेश समारंभास बापूसाहेब भेगडे हेच अनुपस्थित होते. दरम्यान, ते काही कारणास्तव बाहेगावी असल्याने ते अनुपस्थित असून, लवकरच त्यांचा व इतर कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश होणार असल्याचे या वेळी उपस्थितांनी सांगितले.