
सकाळी मोर्चात अन् दुपारी अचानक मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याच्या मृत्यूने रत्नागिरीत हळहळ…
रत्नागिरीमधून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात रत्नागिरीत काल मोर्चा काढण्यात आला होता. मात्र त्याच मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एक नेत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मोर्चाला गालबोट लागलं.
सकाळी आंदोलनात सहभागी झालेले ओबीसी नेते, सामाजिक कार्यकर्ते सुनिल नावले (वय 54) यांचं निधन झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल नावले हे रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कुणबी समाजाचे नेते असून ते सामाजिक कार्यकर्तेही होते. काल (सोमवार) रत्नागिरीमध्ये मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात एक मोर्चा काढण्यात आला होता. सुनिल नवले हे देखील कालच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांचा मोर्चात सक्रीय सहभाग होता..
घरी आल्यावर अस्वस्थ वाटू लागलं, रिक्षातच…
सकाळी मोर्चा यशस्वीपणे पार पडल्यावर सुनिल नावले हे दुपारी त्यांच्या घरी गेले. मात्र घरी गेल्यावर थोड्या वेळीने त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्या घरच्यांसोबत ते लगेच रुग्णलयात तपासणीसाठी निघाले. मात्र रुग्णलयाच्या वाटेवर असताना रिक्षातच नवले यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि ते कोसळले.
त्यांना कुटुंबियांनी कसंबसं रुग्णालयता नेलं, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि अखेर मृत घोषित केलं. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.
सुनिल नवले यांच्या निधनामुळे केवळ त्यांच्या कुटुंबियांवरच नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही बातमी कळताच अनेक नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सकाळी मोर्चात जे सोबत होते, दुपारी त्यांच्याच मृत्यूची बातमी ऐकून अनेकांचा कानावर विश्वासच बसेना. समाजासाठी सातत्याने काम करणारे एक सक्रिय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून नवले यांची ओळख होती. मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.