रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडत इतिहास रचला…
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या टी-20 सामन्यात 2 षटकार लगावताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकारांचा (205) जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर सूर्या आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या जगातील पाचव्या क्रमांकाचा फलंदाज झाला आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज:
रोहित शर्मा – 205
मोहम्मद वसीम – 187
मार्टिन गप्टिल – 173
जोस बटलर – 172
सूर्यकुमार यादव – 150*
याशिवाय सूर्यकुमार यादव हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 षटकार पूर्ण करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. असं करताना त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.
रोहितने 111 डावांत 150 षटकार पूर्ण केले होते, तर हा विक्रम सर्वात जलद पूर्ण करण्याचा मान मोहम्मद वसीमकडे आहे, त्याने फक्त 66 डावांत 150 षटकार ठोकले होते. सूर्यानं हा टप्पा 86 डावांत पार केला आहे.
टी-20I मध्ये सर्वात जलद 150 षटकार ठोकणारे फलंदाज:
66 डाव – मोहम्मद वसीम
86 डाव – सूर्यकुमार यादव
101 डाव – मार्टिन गप्टिल
111 डाव – रोहित शर्मा
120 डाव – जोस बटलर
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास,
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मनुका ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलिया दौर्यावर वनडे मालिका 1-2 ने गमावल्यावर टीम इंडिया आता 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत बदला घेण्यासाठी उतरली आहे. मात्र पावसामुळे सामना खंडित झाला असून आता सामना 18-18 षटकांचा खेळवला जात आहे.
टीम इंडियाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे, तर मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व सांभाळत आहे. जसप्रीत बुमराह वनडे संघात नव्हता, पण आता टी-20 मालिकेत तो आपलं कौशल्य दाखवायला सज्ज आहे.
