मागील काही वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे.
उमेदवारांच्या चाचपणीही सुरू झाली असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उरूण-इस्लामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची जयंत पाटील यांनी घोषणा केली.
उरूण-इस्लामपूरचे नगराध्यक्ष पद यावेळी ओबीसी पुरूष प्रवर्गाला सुटले आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली होती. यात माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि डॉ. संग्राम पाटील यांची नावे चर्चेत होती.
दरम्यान, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांनी मलगुंडे यांच्या नावाची घोषणा केली.
‘३१ पैकी २९ जागा जिंकून मिळवली होती सत्ता’
मलगुंडे अजातशत्रू, मितभाषी आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांना नगरपालिकेमधील कामाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वडिलांनी बापूंना (राजाराम पाटील) मोठी साथ दिली. आपल्या पक्षाने १९८५ मध्ये ३१ पैकी २९ जागा जिंकून नगरपालिकेत सत्ता मिळवली होती”, असे जयंत पाटील मलगुंडे यांचे नाव जाहीर करताना म्हणाले.
“येत्या ४-६ दिवसांमध्ये निवडणुका जाहीर होतील. कामाला लागा. गेल्या ९ वर्षात या शहरात काय विकास झाला? चालू होती ती कामे कशी बंद पडली? हे जनतेला सांगा. जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवावी”, असे आव्हानही जयंत पाटील यांनी दिले.
अजित पवारांची राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही सक्रीय झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे यांचे नाव जयवंत पाटील यांनी पुढे केले आहे. राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मन्सूर मोमीन यांच्यासाठी आमदार इद्रिस नायकवडी हे प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
