दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-आदिवासी समाजातील वारली समजबांधवांनी आपली पारंपरिक रीतिरिवाज परंपरा जोपासत नारान देव “बीज” सण उत्सवातून पिढ्यान-पिढ्या चालत आलेल्या परंपरा जोपासण्याचे कार्य केले आहे.२४ आणि २५ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या बीज उत्सवात शेकडो आदिवासी वारली बांधवांनी उपस्थिती लावून बीज सणाचे महत्त्व जाणून घेतले.पहिल्या दिवशी नारान बीज देवाची पारंपारिक पद्धतीने मांडणी करून विधिवत पूजन करण्यात आले.यामध्ये ओळख,उद्देश,समाजासमोरील आव्हाने व उपाययोजना या विषयावर सखोल चर्चा करण्यात येऊन समाजातील पारंपारिक चालीरीती कशा पद्धतीने जोपासल्या पाहिजेत यावर भर देण्यात येणार असल्याचे नारान बीज देव उत्सव समितीकडून यावेळी सांगण्यात आले.
पारंपारिक असे कांबड नृत्याचे सादरीकरण करून आदिवासी संस्कृतीचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आधुनिक पिढीतील युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जाणकारांनी आपले मत व्यक्त केले.दरम्यान नारान देव बीज उत्सव समितीचे अध्यक्ष सोमा तुंबडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या दोन दिवसीय बीज सणाच्या उत्सवात शेकडो आदिवासी वारली समाज बांधवांनी आपली उपस्थिती लावली होती.वारली समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून सज्जन खुताडे,पालघर जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.रामदास मराड,मावंजी वळवी,सखाराम वड यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.बीज सण हा माघ महिन्यात वसंत ऋतूची चाहूल लागताच साजरा केला जातो.आदिवासी परंपरेप्रमाणे निसर्गातील नव्याने आलेली पालवी,फुले व फळे याचे सेवन करून बीज उत्सव साजरा केला जातो.
विशेष म्हणजे बीज सण झाल्यानंतरच समाजातील लग्नकार्याला सुरवात केली जाते अशी माहिती समाजातील ज्येष्ठ मंडळींकडून या वेळी देण्यात आली.आधुनिकतेच्या काळात नवनवीन उत्सव साजरे होत असतांना आदिवासी ग्रामीण भागात रूढीजात परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळल्या जात असून हे ग्रामीण भागातील एक वैशिष्ट्य मानावे लागेल.या उत्सवाला अखिल भारतीय वारली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय भूयाळ,पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सवरा,मा.आमदार श्रीनिवास वनगा,सचिन शिंगडा,मा.सभापती चंद्रकांत रंधा,नुकताच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा,सोनू म्हसे,जव्हार नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष कुणाल उदावंत,शंकर ईल्हात,दामोदर थाळकर,रवी बुधर याची उपस्थिती लक्षणीय ठरली.
आमच्या समाजातील पूर्वजात पिढ्यान-पिढ्या चालत आलेल्या रिती-रिवाज परंपरा ह्या पुढील पिढीला अवगत व्ह्याव्या व त्या टिकवण्याच्या उद्देशाने या उत्सवाचे आम्ही आयोजन केले होते.
शंकर ईल्हात
आदिवासी वारली संस्कृती अभ्यासक
