अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अबड: “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच शिक्षणाचे खरे सार दडलेले आहे. ‘शि’ म्हणजे शिकायचं, ‘वा’ म्हणजे वाचायचं आणि ‘जी’ म्हणजे जगायचं. हाच मंत्र विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात अंगीकारावा,” असे प्रेरक आवाहन ॲड. कृष्णा शर्मा यांनी केले. निमित्त होते, अंबड येथील शिवबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित विक्रमशिला प्राथमिक निवासी शाळेच्या अभ्यासक्रम उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळ्याचे.
व्यंकटेश नगर येथील शाळेच्या प्रांगणात रविवारी हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘अंबडवार्ता’चे संपादक तथा तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष बळीराम राऊत होते, तर उद्घाटन रामकिसन सोळूंके यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञानाच्या प्रयोगांनी वेधले लक्ष
केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी येथे सायन्स आणि मॅथ्स विषयांच्या विविध प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. चिमुरड्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने मांडलेले हे प्रयोग उपस्थित पालक आणि नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरले.
आदर्श शिक्षकांचा गौरव
पुणे येथे ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित झालेले योगेश हरणे सर यांचा याप्रसंगी संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
मान्यवरांची उपस्थिती
प्रमुख मार्गदर्शक माऊली दोबोले (अध्यक्ष, हंस फाउंडेशन) यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चितीचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी अनुसया हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश मुंढे, पंढरीपार्कचे सर्वेसर्वा मधुकर घुमरे, पत्रकार राजेंद्र गायकवाड, रामकिसन सोळूंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजेत्यांना ‘ट्रॉफी’ आणि कौतुकाची थाप
शैक्षणिक वर्षात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बळीराम राऊत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. शाळेचे संचालक संजय जाधव सर, योगेश हरणे सर, प्रमोद मस्के सर, शितल जाधव मॅडम व योगिता शिंदे मॅडम यांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
