दैनिक चालु वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड: पिसाळलेल्या माकडाने गावातील दोन जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. ही घटना हळदा (ता. सिल्लोड) गावात घडली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माकडास जेरबंद केले आहे. माकडाला पकडण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हळदा येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी माकडाच्या दोन कळपांमध्ये भांडण होऊन एका कळपाचा म्होरक्या जखमी झाला होता. मंगळवारी या माकडाने गावातील एका झाडावर ठिय्या दिला होता. गुरुवारी सकाळी या माकडाने गावात धुमाकूळ घालून गावातील रवींद्र रमेश गवळे व गोपाल पवार यांना चावा घेऊन जखमी केले. त्यांना गावकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती अजिंठा वन विभागाला मिळाल्यावर कर्मचारी गावात आले. त्यांन मोठ्या प्रयत्नानंतर या माकडाला जेरबंद केले. दरम्यान, वन्यप्राणी गावातील शेळ्या, मेंढ्यांवर हल्ले करतात. त्यांच्याकडे वनविभागाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली.
