दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. यासाठी राज्यभरातील लाखो कर्मचारी संपावर गेल्याचे समोर आले आहेत. दरम्यान याचवेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील या संपाला पाठिंबा दिला असून, विभागातील 45 हजारांवर कर्मचारी संपावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
नव्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून, जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 17 लाख शासकीय-निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यात मराठवाड्यातील सुमारे 45 हजार राज्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. तर आपली मागणी पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरु राहणार असल्याची माहिती मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे डॉ. देविदास जरारे यांनी माध्यमांना दिली आहे.
शासकीय निमशासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार असून, याचे पडसाद सर्वच जिल्ह्यात पाहायला मिळणार आहेत. दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सकाळी 10 वाजता सर्व कर्मचारी एकत्र येऊन संपात सहभागी होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी एकत्र येण्याचे आवाहन मध्यवर्ती संघटनांनी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
-नवीन पेन्शन योजना रद्द करणे
-प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन
सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे
-कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा
-सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा
-निवृत्तीचे वय 60 करा
-नवीन शिक्षण धोरण रद्द करा
-आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करा
शिस्तभंगाची कारवाई होणार…
शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांना पुकारलेल्या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सरकराने दिला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा देखील शासनाकडून करण्यात आला आहे.
