दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती -श्रीकांत नाथे
▪️२३ मे पासून अतिक्रमण हटाव मोहीम तर अतिक्रमण धारकांनी स्वतः अतिक्रमण काढून घ्यावे-मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- अंजनगाव सुर्जी शहरात वाढत्या अतिक्रमणावर आता नगरपरिषदेचा गजराज चालणार असून मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनात येत्या २३ मे पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.तरी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी अतिक्रमण धारकांना तारखेच्या आधी अतिक्रमण स्वतः काढण्याचे आवाहन केले आहे.
अंजनगाव सुर्जी शहराच्या कानाकोपऱ्यात अतिक्रमण वाढले आहे.त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून शहरात तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहीम २३ मे रोजी पासून मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनात सुरू होणार आहे.रस्त्यावर फूटपाथवर रस्त्याच्या कडेचे तसेच नगरपरिषदेच्या जागेवरील व लेआउट मधील अतिक्रमण काढण्याचे आदेशाच्या नोटीस अतिक्रमण धारकांना मुख्याधिकारी प्रशांत उरकडे यांनी बजावले आहे.महामार्गाच्या तसेच शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला अतिक्रमणामुळे होणारा अडथळा निर्माण करणारे आणि त्यामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी यातून आता वाहतुकीला मोकळा श्वास मिळणार आहे.अतिक्रमण जागेवर ताबा केलेल्यांना नगरपरिषद मार्फत नोटीस जारी करण्यात आले असून २४ तासाच्या आत अतिक्रमण धारकांनी स्वतः आपले अतिक्रमण काढावे अन्यथा “नगरपरिषदेचा गजराज आपल्या मालमत्तेवर चालणार” असे दिलेल्या नोटीस द्वारे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी अतिक्रमण धारकांना ठणकावून सांगितले आहे.त्यामुळे अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढताना काही नुकसान झाल्यास त्याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहणार नाही तसेच अतिक्रमण काढण्याकरिता येणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल करून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
सदर अतिक्रमण काढण्याबाबत मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे आदेश काढले आहेत.अतिक्रमण मोहीम राबवतेवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता शहरात कोणतेही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीसांच्या चोख बंदोबस्तात स्थानिक महसूल प्रशासन,वीज वितरण विभाग,नगरपरिषद प्रशासन,अग्निशमन दल सदर अतिक्रमण हटविण्याच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.
