तहसीलदार मुंडे व टीमची तत्परता ८ हजार २१४ लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – केंद्र व राज्य शासन योजनेतील निराधार श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ योजनेतील लाभार्थ्यांचे एका महिन्याचे ८ हजार २१४ लाभार्थ्यांना ७६ लाख २४ हजार रुपये मानधन ऐन नागपंचमी सणाच्या दिवशी त्यांच्या त्याच्या खाती जमा केले.
लोहा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतील जून महिन्यातील ८ हजार २१४ लाभार्थीच्या खात्यावर ७६ लाख २४ हजार ९०० रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच माहे मे २०२३ मध्ये शासन आपल्यादारी उपक्रमांतर्गत मंजुर केलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे.
निराधारांना ऐन सणासुदीच्या काळात मानधन वेळेवर मिळाल्याने त्यांना मोठा आधार मानला जातो. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ दिला जातो. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार अशोक मोकले, संजय गांधी विभागातील वैशाली चाटे व दयानंद मळगे यांच्या नियोजनामुळे निराधारांना सणासुदीला लाभ मिळाल्याने लाभधारकांत चैतन्य आले आहे.
