दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नादेड(देगलूर):आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या हुतात्म्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशासाठी आत्मसमर्पण केले (जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले) त्यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आज सर्वत्र स्वातंत्र्यावर भाषणं, स्वातंत्र्य गीतं, राष्ट्रीय गीतं, ध्वजवंदन आणि एकंदरीत स्वातंत्र्य दिवस आहे. ह्या अनुषंगाने सर्वत्र देशप्रेम, आदर, भावनांचे चित्र पाहावयास मिळत आहे. “हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई हम सब भाई भाई” असे चित्र आज दिसत आहे.
ते सर्व ठीक आहे. पण हे फक्त आजच्या दिवसा पुरताच का ? १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आले की देशभक्ती घराघरातून, गल्लीबोळातून, गावागावातून पाहावयास का मिळते ? इतर दिवशी कुठे जाते ही देशभक्ती ? भाईचारा दाखवणारे ते चित्र एका दिवसाचे का असते? आणि सर्वात महत्त्वाचे आज भारत देश स्वतंत्र झालाआहे. पण त्या देशातील स्त्रीयांचं काय ? ती स्वतंत्र झाली आहेत का ?स्त्रीच्या अब्रूला जेव्हा हात लागतो, तिच्यावर अन्याय, अत्याचार, बलात्कार होतो तेव्हा म्हणता येईल का, आजची स्त्री स्वतंत्र आहे म्हणून ?
रात्रीची वेळ सोडूनच द्या, पण आजच्या क्षणी ती भर दिवसाही सुरक्षित नाही. मग अशावेळी कोणत्या अर्थाने हा भारत देश स्वतंत्र झाला आहे असं म्हणता येईल ? ह्या देशातील प्रत्येक स्त्री ही मणिपूरच्या त्या घटनेने भांबावून गेली आहे. एक अनामिक भीती आज स्त्रीयांच्या मनात आहे की, आज अशी घटना तिथे घडली आहे, उद्या आमच्या गावात घडली तर ? मणिपूर सारख्या अशा कितीतरी घटना रोज आपल्या आजूबाजूला होत असतात.ज्यामधून माणूस किती विकृत आणि नीच पातळीवर जातोय हे समजते. रोज कोणतेही वर्तमानपत्र उघडून बघा कुठे ना कुठे तरी स्त्रियांच्या अत्याचाराबद्दल बातमी दिसतेच. देशात रोज कितीतरी स्त्रियांच्या बाबतीत अन्याय घडत असतो आणि आपण म्हणतोय “मेरा भारत महान”. असा कसा महान ? असा कसा स्वतंत्र ?
परकीयांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र झाला, पण महिला आजही गुलामगीरीत, अन्यायाखाली दबून आहेत आणि तरीही भारत स्वतंत्र झाला ?
ज्या दिवशी देशात दिवसाला, तासाला, आणि मिनिटाला एकही बलात्कार, अत्याचार, अन्याय होणार नाही, फक्त महिलादिनाच्या निमित्ताने नव्हे तर रोज महिला म्हणून तिला आदर, सन्मान मिळेल, रात्री १२ वाजताही ती रस्त्यावरून निश्चिंत मनाने वावरू शकेल, त्या दिवशी मी साऱ्या जगाला अभिमाने सांगेन की, आज माझा भारत खऱ्याअर्थाने स्वतंत्र झाला आहे.
