महायुतीत सत्ता स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून बैठकांचा सपाटा लावला जात आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रिपदाचा पेच कायम असल्याची चर्चा आहे.
एकीकडे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असताना नवा फॉर्म्युला समोर आला आहे. एका वर्षांसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशाची त्सुनामी पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने २३० जागा मिळवल्या. तर महायुतीने महाविकास आघाडीची गाडी ४६ जागांवर रोखली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यात महायुतीला २३० जागा मिळाल्यानंतर त्यांचं सरकार येणार असल्याचं निश्चित अडलं. मात्र, महायुतीची गाडी सत्तावाटपावर अडली आहे.
गेल्या दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. तर एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला उपमुख्यमंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून या फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानंतर आता महायुतीचा नवा फॉर्म्युला हाती आला आहे. महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्रिपदी कोण याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याने उशीर होत असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या फॉर्म्युल्यानुसार, सुरुवातीचे एक वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात. भाजपकडूनही दुजोरा मिळाल्याची माहिती आहे. महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली. मतदारांना त्यांना कौल दिल्यामुळे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. आता हा नवा फॉर्म्युला कितपत खरा ठरतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
दरम्यान, महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीदरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संजय शिरसाट म्हणाले, ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याचं उत्तर अद्याप कोणालाच सापडलं नाही. राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार, यावर चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे दरे गावी जातात. ते मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगावात जातात. दरेगाव हे शिंदे यांचे आवडीचं ठिकाण आहे’.
