महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी काल (रविवार,15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. यात यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे पाचव्यादा आमदार म्हणून निवडून आलेले संजय राठोड यांनीही आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली
मात्र महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी यापूर्वी गंभीर आरोप केले होते. अशातच संजय राठोड यांना माझा विरोध कायम राहील, असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी पुन्हा एकदा घेतला आहे.
मुळात उद्धव ठाकरे यांना मी प्रश्न विचारते की त्यांनी संजय राठोड यांना क्लीनचीट का दिली? राठोड यांना जरी मंत्रीपद दिले असलं तरी माझा विरोध हा कायम राहणार आहे, असे म्हणत संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आमदार चित्रा वाघ यांनी आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्यानेत्या सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत हल्ला चढवला आहे. महिलांसंदर्भात वादग्रस्त ठरलेल्या संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळाली आहे. संजय राठोडला मंत्रिपदाची शपथ घेताना पाहून पूजा चव्हाणच्या आत्म्याला काय वाटत असेल? असा सवालही त्यांनी केला आहे. तर दुटप्पी, हलकट प्रवृत्तीवर न बोललेलं बरं, असे म्हणत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांवर हल्ला चढवला आहे.
दुटप्पी, हलकट प्रवृत्तीवर न बोललेलं बरं- सुषमा अंधारे
महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाघ यांनी पोलीस स्टेशनला जाऊन पीडित कुटुंबीयांच्या न्यायाची मागणी केली होती. तसेच, संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासही महाविकास आघाडी सरकारला भाग पाडले होते. मात्र, शिवसेनेतील बंडानंतर संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पुन्हा भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. शिवाय त्यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ ही घेतली आहे. याच मुद्यावरून सुषमा अंधारेंनी टीका केली आहे.
सरकार सत्तेवर येऊन अनेक दिवस झाले, अजून खाते वाटत नाही.मात्र या काळात हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहे. या घटनांची जबाबदारी कोण घेईल? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.ड्रग्स च्या नावाखाली अनेक आरोप झाले. मात्र कोणती कारवाई झाली नाही. तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून असलेले शंभूराजे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. नाशिकमध्ये ड्रग्सचे जाळे असताना तत्कालीन पालकमंत्री दादा भुसे अपयशी ठरले होते, त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. सतत वादग्रस्त बोलणाऱ्या संजय शिरसाटला मंत्री पदाची संधी मिळाली आहे.
तानाजी सावंत, धर्मराव बाबा आत्रामांवर गुन्हे दाखल करणार का?
तानाजी सावंत आणि धर्मराव बाबा आत्राम या दोघांच्या संगनमताने जो बनावट औषध प्रकरण गाजले होते, त्यानंतर आम्ही आवाज उठवला होता, कालच्या मंत्रिमंडळात दोघांना बाहेर ठेवले आहे. ही अभिनंदनाची गोष्ट आहे. तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्री असताना औषध खरेदीसाठी औषध खरेदी प्राधिकरण स्थापन केले होते. मात्र त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आले. बनावट पद्धतीच्या औषध खरेदी करण्यात आले. ज्या कंपन्यावर बनावट औषध प्रकरणी आंबेजोगाई आणि बीडमध्ये गुन्हे दाखल झाले, त्याच कंप्लेंट विरोधात अनेक दिवस आधी भिवंडी आणि इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. अशा कंपन्यांना तानाजी सावंत यांनी पुन्हा संधी कशी दिली? यापैकी काही कंपन्यांचा गुजरात कनेक्शन आहे. तानाजी सावंत आणि धर्मराव बाबा आत्राम दोघांच्या विभागांनी या कंपन्यांना न तपासता प्रमाणपत्र दिले. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी या दोघांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवले आहे, मात्र यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? असा सवालही सुषमा अंधारेंनी केला आहे.
