उदयनराजे भोसले आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 20 खासदारांनी पक्षादेश धुडकावल्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या 20 खासदारांना व्हीप धुडकावल्याप्रकरणी भाजपने नोटीस दिली आहे.
लोकसभेमध्ये मंगळवारी वन नेशन वन इलेक्शन बिल मांडलं गेलं, यावेळी संसदेत गैरहजर राहिलेल्या खासदारांना भारतीय जनता पार्टीने नोटीस पाठवली आहे. मंगळवारी भाजपने लोकसभा खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन लाईनचा व्हीप जारी केला होता. एक देश एक निवडणूक हे बिल भाजपने लोकसभेत सादर केलं.
भारतीय जनता पक्षाने ज्या खासदारांना नोटीस पाठवली, त्यांची नावंही समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे. याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही पक्षाचा व्हीप धुडकावल्यामुळे नोटीस धाडण्यात आली आहे.
भाजपने कुणाला धाडली नोटीस?
जगदंबिका पाल
शांतुनू ठाकुर
बीएस राघवेंद्र
गिरीराज सिंह
ज्योतिरादित्य सिंधिया
विजय बघेल
भागीरथ चौधरी (मंत्री, पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जयपूरमध्ये)
उदयनराजे भोसले
जयंतकुमार रॉय
जगन्नाथ सरकार
बिल जेपीसीकडे
वन नेशन वन इलेक्शनचं बिल कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या बिलावरून लोकसभेमध्ये जोरदार हंगामा झाला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या बिलावरून वेगवेगळी मतं मांडली. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या बिलाचा विरोध केला. तर शिवसेना आणि टीडीपी या एनडीएच्या घटकपक्षांनी या बिलाला पाठिंबा दिला. डिव्हिजननंतर हे बिल सादर केलं गेलं आणि त्यानंतर जेपीसीकडे पाठवण्यात आलं.
बिलाच्या बाजूने 269 आणि विरोधात 198 मतं
लोकसभेमध्ये हे बिल मांडण्यात आल्यानंतर बिलाच्या बाजूने 269 आणि विरोधात 198 मतं पडली. संपूर्ण देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली गेली होती, यानंतर मार्च महिन्यात समितीने रिपोर्ट दिला होता. यावर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने हा रिपोर्ट मंजूर कला. या रिपोर्टमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा आणि पंचायत निवडणुका एकत्र करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
