मंत्रिपदावरून शिवतारेंची खदखद..!
महायुतीच्या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे भाजप शिवसेनेसह राष्ट्रवादी अजित पवार गटातील विविध नेते नाराज आहेत. नाराज नेते उघडपणे आपल्या पक्षाविरोधात भूमिका घेत असून नाराजी व्यक्त करत आहेत.
पुरंदरचे शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनाही मंत्रीपद मिळेल असं वाटत होतं. याबाबतचा दावाही त्यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र अखेरच्या क्षणी शिवतारे यांचा मंत्रीमंडळातून पत्ता कट झाला. त्यानंतर विजय शिवतारे यांनी मंत्रीपद नाकारण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे.
शपथविधी सुरू असताना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती. पण सगळा शपथविधी पार पडला, तरी माझं नाव आलं नाही. प्रचंड चीड आली. माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने विरोधात काम केल्याचाही आरोप केला.
मंत्रीपद नाकारण्याबाबत विचारलं असता विजय शिवतारे म्हणाले की, त्यावेळी मला प्रचंड राग आला. माझ्या नाती टाहो फोडून रडतायत. तुम्ही एक दिवस आधी सांगितलं असतं तर आम्ही कुणीच आलो नसतो. शेवटच्या क्षणापर्यंत आता नाव येईल, आता नाव येईल, अशी अपेक्षा होती. पण सगळा शपथविधी पार पडला पण नाव नाही आलं. हेच त्यांच्या घरात झालं असतं, अशा प्रकारे वागणूक मिळाली असती तर राग आला नसता का? माझी नातवंडं ओरडतायत, माझी प्रचंड चीड झाली, अशा शब्दांत शिवतारे यांनी खदखद व्यक्त केली.
मंत्रीपद मिळू नये म्हणून मित्रपक्षांकडून काही अडचणी निर्माण झाल्या असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता शिवतारे पुढे म्हणाले, “मला असं वाटत नाही. पण एक कॉमन सेन्स म्हणून विचार केला, विजय शिवतारे निवडून येऊ नये म्हणून निर्लज्जपणे त्यांनी काम केलं. मला तिघांनी मिळून शब्द दिला होता. विधानसभेच्या वेळी काही अडचण येणार नाही. आम्ही सगळे एक आहोत. आतापर्यंत तुम्ही आमची दुष्मणी पाहिली, आता दोस्ती बघा, असं तेच बोलले होते. आता तुमची दोस्ती महाराष्ट्रानं बघितली, तुमच्या शब्दाला आणि तुमच्या वक्तव्याला किती किंमत आहे, हेही लक्षात आलं. आम्ही मात्र दिलेला शब्द पाळला, शेवटपर्यंत दोस्ती ठेवली, अशी प्रतिक्रिया विजय शिवतारे यांनी दिली.
