जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Massajog Sarpanch Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत.
या घटनेचे पडसाद नागपूर आणि दिल्लीच्या अधिवेशनात देखील उमटले. आज शरद पवारांनी देखील बीडला जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना बीडचे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर संतापले. घडलेल्या प्रकाराचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड असून त्यानेच काशी केली आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केली आहे.
आपल्याला रडून जमणार नाही : संदीप क्षीरसागर
संदीप क्षीरसागर म्हणाले, संतोष देशमुखांच्या कुटुंबाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली. आमदार म्हणून आम्ही कुटुंबाची काय जबाबदारी घ्यावी हे तुम्ही गावकरी मिळवून ठरवा आणि सांगा आम्ही ती जबाबदारी घेऊ. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मास्टरमाईंड वाल्मिकी कराडच आहे. बीड जिल्हा हा पुरोगामी आहे. दोन समाजात तेढ निर्माण केलाय या माणसाने… आपल्याला रडून जमणार नाही. मी आणि बाप्पांनी सभागृहात मांडलय.घाबारायचं कारण नाही . भविष्यात आम्ही ताकदीने साथ देणार आहे.
त्याचं नाव घ्यायला लोकं घाबरतात : संदीप क्षीरसागर
खंडणीच्या विषयात वाल्मिक कराडचे नाव टाकले आहे त्यात त्याला अजून अटक नाही. सूत्रधार, सूत्रधार काय करता नाव घ्यायला का घाबरता…. त्याच्यामुळे दोन समाजात भांडण लागली आहे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
गेलेला माणूस परत येत नाही. मदत दिली तरी कुटुंबाचं दु:ख जाणार नाही. आम्ही त्यावर टीका करत नाही. पण जोपर्यंत याच्या खोलात जाऊन चौकशी करा. सूत्रधार जे आहेत. त्याला तातडीने धडा शिकवला पाहिजे. या गावात दहशतीचे वातावरण आहे. कृपा करा दहशतीतून बाहेर पडा. आपण सर्व मिळून तोंड देऊ. एकदा आपण एकत्र उभं राहिल्यावर कोणी आपल्याला आडवू शकत नाही. बीडमध्ये ही गोष्ट घडतेय. ही गोष्ट बरोबर नाही. न्याय मिळाला पाहिजे. दु:खात आपण सर्व आहोत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही , असा इशाराही शरद पवारांनी दिला.
