दिवसांपूर्वी बीडच्या केज तालुक्यात एक राजकीय हत्या झाली होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या केली होती. ही राजकीय हत्या ताजी असताना राजकीय वर्तुळातून खळबळजनक माहिती समोर आली आहे.
ठाणे क्राइम ब्रान्चने शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराच्या हत्येचा कट उधळून लावला आहे.
अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांना मारण्यासाठी कट शिजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत काहीजणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही स्थानिक राजकीय नेत्यांना कट रचण्यावरून नोटीस बजावली आहे. पण सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या हत्येचा अशाप्रकारे कट रचल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचला जात होता. त्यासाठी काही शूटर्सला सुपारी देण्यात आली होती. लातूर येथील एका कौटुंबीक कार्यक्रमात आमदार किणीकर यांची हत्या करण्याचा डाव होता, याबाबतची माहिती किणीकर यांना मिळाली होती. किणीकर यांच्या कार्यकर्त्यानेच याबाबतची टीप दिली होती. हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बालाजी किणीकर यांनी ही माहिती ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिली. तसेच त्यांनी या प्रकरणात चौकशी करण्याची विनंती केली.
किणीकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे क्राइम ब्रान्चने काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तसेच ज्याच्या सांगण्यावरून ही राजकीय हत्या घडवली जाणार होती, त्या स्थानिक राजकीय नेत्याला देखील पोलिसांनी नोटीस बजावली आहे. बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून मागच्या चार टर्मपासून निवडून येतातय. शिंदे गटातल्या अशा महत्त्वाच्या नेत्याच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आल्याने पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
