CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची अपडेट..!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या तीन दिवसापासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.
या सगळ्या घडामोडीत वाल्मिक कराडने पुण्यात आत्मसर्मपण (सरेंडर) केल्याचे वृत्त समोर आले. यावर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या महिलेची रविवारी सकाळपासून चौकशी केल्याची माहिती आहे. सीआयडीने या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिकी कराडही लपला आहे. सीआयडीने त्याचे बँक खाते गोठवले असून त्याच्या भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे.
वाल्मिक कराडने सरेंडर केलं?
रविवारी रात्री उशिरा वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडी अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केल्याची माहिती समोर आली होती. वाल्मिक कराडने सरेंडर केल्याच्या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना वृत्त फेटाळून लावले. वाल्मिक कराडला अटक केलीय अथवा त्याने सरेंडर केलंय अशी कुठलीही कारवाई झाली नसल्याचे एडीजी सीआयडी प्रशांत बुरुड यांनी सांगितले. वाल्मिक कराडला अटकही केली नाही अथवा ताब्यात घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ वाल्मिक कराड हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.
आतापर्यंत काय तपास झाला?
तपास पथकाने आरोपींचे दोन मोबाईल जप्त केले आहेत. गाडीवर आढळलेले ठसे आरोपींसोबत जुळले. फरार असलेल्या 4 आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले. यामध्ये वाल्मिक कराड याच्या खात्यांचा समावेश आहे. आरोपींचा केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोव्यात शोध सुरू करण्यात आला आहे. आजपर्यंत 115 जणांची CID ने केली चौकशी केली आहे. वाल्मिक कराडच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दोन महिलांवर CID ची बारीक नजर आहे. त्यांची काल चौकशीदेखील झाली होती
