दैनिक चालु वार्ता गारगोटी प्रतिनीधी : अशोक कांबळे
भारत-चीन सीमेवर मणिपूर येथे सेवारत असताना शित्तूर तर्फ मलकापूर गावचे सुपुत्र शहीद जवान सुनील विठ्ठल गुजर यांना गुरुवार (ता. १३ मार्च) रोजी वीरमरण आले. मूळ गावी त्यांच्यावर (ता. १७) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील विठ्ठल गुजर यांनी थरथरत्या हातांनी चितेला भडाग्नी दिला.
१५६००६०८ एन सॅपर पदावरील ११० इंजिनियर रेजिमेंट बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये कर्तव्य बजावणारे सुनील हे मनमिळाऊ आणि संयमी होते. सुस्वभावामुळे त्यांचा विलक्षण मोठा आप्तस्वकीय आणि मित्रांचा चांगलाच गोतावळा होता. दोनच वर्षांपूर्वी सुनील यांचा स्वप्नाली यांच्याशी विवाह झाला होता. पाच महिन्यांपूर्वीच त्यांना मुलगा झाला होता. बाळाचे तोंड पाहण्यासाठी, पुत्रमुख प्रत्यक्ष पाहण्यासाठी सुनील १२ मार्चला सुटी घेऊन गावी येणार होते. इकडे पाच महिन्याच्या रियांशला आई अलवारपणे, लडिवाळपणे सांगत होती, की तुला भेटायला, तुझ्यासोबत छान छान गप्पा मारायला तुझे पप्पा येणार आहेत. मात्र रजा नामंजूर झाली आणि जवान सुनील गुजर शहीद झाल्याची बातमी धडकली. गुजर कुटुंबियांवर आभाळ कोसळले. नियतीच्या विसंगत वागण्याने बाप-लेकाची भेट राहूनच गेली. व्हीडिओ कॉलवरील भेट ही आभासी होती. खरं सुख तर आपल्या बाळाला घरी येऊन करकचून, घट्ट मिठी मारुन, डोळे भरून प्रत्यक्ष पाहण्यात होतं. मात्र, सुनील यांना मुलाचे तोंडही पाहता आले नाही. पितृछत्र हरपलेल्या रियांशला देखील आपले वडील निपचित, अबोल अवस्थेतच भेटले. बाप-लेकाची ही अशी मन हेलावून टाकणारी पहिली आणि शेवटचीच भेट ठरल्याने सबंध शाहूवाडी तालुका हळहळ व्यक्त करत आहे. अंत्यसंस्कारावेळी गुजर कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. याप्रसंगी अभिव्यक्त झालेला आक्रोश मन सुन्न करणारा, काळीज पिळवटून टाकणारा होता.
यावेळी शहीद जवान सुनील गुजर यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण, आमदार डॉ. विनय कोरे, माजी आमदार सत्यजीत पाटील, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर, सैन्य दलातील अधिकारी, राजकीय सामाजिक आणि शासकीय सेवेतील अधिकारी तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि हजारो देशभक्त उपस्थित होते. मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करत शहीद जवानाच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले.
यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत ‘भारत माता की जय’, ‘अमर रहे, अमर रहे – सुनील गुजर अमर रहे..’ अशा घोषणा देत पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला आणि देशाच्या सीमेवर रक्षण करताना शहीद झालेल्या जवान सुनील गुजर यांना अखेरचा निरोप दिला.
—————————


