दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
शाळा ज्ञानदाना बरोबरच सुसंस्काराचे केंद्र आहे. शाळेत शिक्षक ज्ञानाबरोबरच सुसंस्कार करण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांवर परिपूर्ण संस्कार करण्यासाठी शाळा आणि शिक्षकांना पालकांचेही सहकार्य आवश्यक असते.असे प्रतिपादन वीरुपाक्ष महाराज मुखेडकर यांनी केले. ते येथील संस्कृती डिजिटल स्कूलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार उपस्थित होते.
दि.२४ मार्च रोजी शहरातील अतिशय अल्पकाळात नावारुपाला आलेल्या संस्कृती डिजिटल स्कूलचा ‘ओळख महापुरुषांची यशोगाथा’ हा विशेष वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम चिद्रावार मिल मैदानावर आयोजित करण्यात आला होता. सरस्वती पूजनानंतर विद्यालयाच्या संचालिका स्वाती बोडके यांनी विद्यालयाने आजपर्यंत केलेल्या कार्याचा संक्षिप्त अहवाल सादर केला.याप्रसंगी पुढे बोलताना वीरुपाक्ष महाराज म्हणाले की, इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे;परंतु इंग्रजी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना प्राचीन सनातन संस्कृतीचेही शिक्षण देणे गरजेचे आहे.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार म्हणाले की, श्रीमंतांची मुले चांगले शिक्षण मिळावे म्हणून शहरातील नावाजलेल्या शाळेत शिकण्यासाठी जातात;परंतु गोरगरीब, सामान्य आर्थिक परिस्थितीत असलेल्या नागरिकांची मुले दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात.शंकरराव बोडके सरांनी सुरू केलेल्या संस्कृती डिजिटल शाळेच्या माध्यमातून मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत असल्यामुळे यापुढे गोरगरीब, सर्वसामान्य पालकांच्या मुलांना चांगल्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाऊन राहण्याची गरज नाही. याप्रसंगी विद्यालयातील चिमुकल्यांनी गणेश वंदनेनंतर प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ, लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, श्रीदेवी यांना मानवंदना देणारा कार्यक्रम सादर केला. छावा थीम, हिरकणी थीम, स्पोर्ट्स टीम आदी अनेक उत्कृष्ट कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित प्रचंड जनसमुदायाची मने जिंकली. अतुल सर यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.अंकुश देसाई देगावकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील थडके, सौ.विजयमाला बोडके, माधवराव बोडके, केंद्रप्रमुख पांचाळ, डॉ. झरीकर,संभाजी पाटील सुगावकर, राजमोडे, राजू पाटील मलकापूरकर, माधवसिंग ठाकूर, विशाल पवार, प्रा.निवृत्ती भागवत, ऍड.रमेश जाधव यांच्यासह जवळपास चार हजारावर पालक,नागरिक, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाश्री सूर्यवंशी व विजयालक्ष्मी झरे यांनी केले तर आभार संस्थाचालक शंकरराव बोडके यांनी मानले.
