दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर .
( पुणे ) वाघोली : माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्याकडून सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते सध्या हे आंदोलन करत आहेत.काहीही झालं तरी मी अन्नाचा एकही कण घेणार नाही, असं बच्चू कडू यांनी याआधीच जाहीर केलं आहे. दरम्यान, आता कडू यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. अशातच आता समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सोनसळे वेलफेअर फाउंडेशनने पाठिंबा दर्शविला आहे.
सोनसळे वेलफेअरचे संस्थापक अध्यक्ष किशोर सोनसळे, शितल सोनसळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे निवेदन देत मा. मंत्री बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांग विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतमजूर, युवक यांच्या हितासाठी केलेल्या विविध सर्व मागण्या रास्त असून आपण त्या तात्काळ मान्य करत त्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडवावे अशी मागणी केली आहे.
या वेळी बोलताना किशोर सोनसळे म्हणाले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, असे सत्ताधारी पक्षांने निवडणुकीच्या संकल्पपत्रात जाहीर केलेले आहे. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला जाणार होता. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊन अनेक महिने होऊनही सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही. सध्या शेतकरी अडचणीत असून उत्पादन खर्च वाढला असून शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, ही बच्चू कडू यांची रास्त मागणी असल्याचे सांगितले. तसेच बच्चू कडू यांनी समाजातील इतर घटकांच्या हितासाठी केलेल्या विविध मागण्याही राज्य सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणीही किशोर सोनसळे यांनी केली आहे.सोनसळे वेलफेअर फाउंडेशन https://www.sonsale.org या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तळागाळातील लोकांसाठी काम करत आहे.
