अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य !
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची येत्या 22 जूनला निवडणूक आहे. या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार दंड थोपटून उतरलेत. या निवडणुकीसाठी स्वतः अजित पवार यांनी ब वर्ग सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रचारादरम्यान पाहुणेवाडी येथील ओम साई लॉन्स येथे आयोजित सभेत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यमुळे वाद निर्माण झाला आहे.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात धीरूभाई अंबानी यांचा उल्लेख करत एक विधान केलं. “पंपावर पेट्रोल चोरूनच धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला” असं अजित पवार भाषणात बोलून गेले. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे. “मला सहकार टीकवायचं नसतं, तर मी पेट्रोल पंप काढले असते का? माझी गोरगरिबांची मुलं तिथं लागली ना कामाला. पंपावर काम करणं कमीपणाचं नाही. पंपावरच पेट्रोल चोरून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाला. पडेल ते काम करण्याची तयारी असली पाहिजे.” असं अजित पवार बोलत होते.
“मी जर सहकार मोडायला निघालो असतो, तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? माझा खाजगी कारखाना काढायची तयारी नव्हती. सरकारने बंधनं घातली, पण आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवायला दिले नाहीत.” असंही पुढे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, या वक्तव्यावरून अजित पवार यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. धीरूभाई अंबानी यांच्या यशाचं रहस्य सांगताना केलेलं हे विधान काहींना मिश्किल वाटलं, तर काहींनी याला अंबानी यांच्या प्रतिमेला धक्का लावणारं मानलं. यामुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेतही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. अजित पवार यांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनेल रिंगणात उतरल्याने ही लढत तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता आहे.
