मंत्री झिरवाळांची की श्रीराम शेटेंची ?
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुकांमध्ये उमेदवारी बाबत हुरहुर आहे. सत्तेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे सध्या इच्छुकांची मोठी गर्दी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने नाशिक जिल्ह्यात तीन मंत्री दिले आहेत. यामध्ये दिंडोरी आणि पेठ मतदारसंघात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आहेत. स्वतः झिरवाळ अतिशय चातुर्याने विधाने करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेमुळे मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष कोणता आणि शरद पवार यांचा पक्ष कोणता याबाबत खुद्द समर्थकांमध्येच मोठा गोंधळ आहे. राज्यात शरद पवार आणि तालुक्यात शरद पवारांचे समर्थक नेते व सहकार्यावर वर्चस्व असलेल्या श्रीराम शेट्टी या दोघांनाही मंत्री झिरवळ आपले गुरु आणि नेते मांडतात. त्यामुळे बहुतांश पदाधिकारी आणि समर्थक दोन्ही पक्षांच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात.
या गोंधळाच्या वातावरणामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे इच्छुक यांच्यामध्ये मोठा गोंधळ आहे. मंत्री झिरवाळ सध्या सत्तेत असल्याने त्यांच्या विरोधात जाणे, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या सदस्यांना सोयीचे नाही. त्यामुळे मोठी गर्दी झिरवाळ यांच्या भोवती दिसते.
मंत्री नरहरी झिरवाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सत्तेत असले तरीही शिवसेना उद्धव ठाकरे या मतदारसंघात एक प्रबळ विरोधक म्हणून पाय रोवून आहे. त्याचे नेते जयंत दिंडे, सतीश देशमुख माजी आमदार रामदास चारोस्कर पांडुरंग गनोरे हे नेते पक्षाची धुरा सांभाळत आहेत. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याची कसब शिवसेना ठाकरे गटाने दाखवले होते.
दिंडोरी आणि पेठ या दोन्ही तालुक्यात शिवसेना ठाकरे पक्षाचा मतदारांवर प्रभाव टिकून आहे. पक्षाकडे नेते नसले तरीही कार्यकर्त्यांची यंत्रणा सक्रिय आहे. त्यामुळे नव्या दमाच्या उमेदवारांची राजकीय चाचपणी हा पक्ष करणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रस्थापित नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी जिल्हा परिषदेत लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत ८ पैकी ५ गट शिवसेनेकडे होते. काँग्रेस अर्थात रामदास चारोसकर यांच्याकडे २ तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाले होते.
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन शिवसेना ठाकरे पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या समवेत समन्वय ठेवला आहे. काही गटांमध्ये काँग्रेसचा देखील प्रभाव आहे. अशा स्थितीत शिवसेना ठाकरे गट कॅल्कुलेटिव्ह पद्धतीने राजकीय पावले टाकत आहे.
आगामी निवडणुकीत दिंडोरी आणि पेठ या दोन्ही तालुक्यांमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांना आपली ताकद दाखवून द्यावी लागेल. त्यांच्याकडे इच्छुकांची गर्दी मोठी आहे. प्रस्थापित स्थानिक नेत्यांचे दडपण झुगारून त्यांना मैदानात उतरावे लागेल. तीच झिरवाळ यांची परीक्षा असेल. सध्या सोयीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वावरणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही खरे रूप त्यातून उघड होईल.
शिवसेना शिंदे पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचा मात्र या मतदारसंघात हर्ष प्रभाव दिसत नाही. सत्तेत असल्याने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात सध्या भाऊलाल तांबडे, माजी आमदार धनराज महाले, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण जाधव, सुनील पाटील हे पदाधिकारी आहेत. बूथ लेवलला अथवा गाव पातळीवर या पक्षाला मतदारांमध्ये फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीत या पक्षाने अपेक्षा न केलेलीच बरी.
