माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांचा मोठ्या भावावर आरोप !
भारतातील सर्वात मोठ्या टीव्ही चॅनलपैकी एक असलेल्या सन टीव्ही चॅनल नेटवर्कमधील कौटुंबिक वाद समोर आला आहे. कोट्यवधींच्या साम्राज्यासाठी दोन भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
कोट्यवधींच्या शेअर्सवरून माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन आणि त्यांच्या भावात चांगलाच वाद पेटला आहे. सध्या मारन बंधूच्या कौटुंबिक वादाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
माजी मंत्री दयानिधी मारन यांनी त्यांचे मोठे बंधू कलानिधी मारन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कलानिधी मारन यांनी २००३ मध्ये सन टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे १२ लाख शेअर्स फक्त १.२ कोटी रुपयांना खरेदी केले असून तेव्हा त्या शेअर्सची वास्तविक किंमत सुमारे ३,५०० कोटी रुपयांच्या घरात होती, असा आरोप दयानिधी मारन यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात दयानिधी मारन यांनी कायदेशीर नोटीसमध्ये आरोप केला की कलानिधी मारन यांनी योग्य मूल्यांकन आणि इतर भागधारकांची संमती किंवा कोणत्याही योग्य मोबदल्याशिवाय हा प्रकार केला आहे. त्यामुळे ते बेकायदेशीरपणे भागधारक बनलेले आहेत. नियमानुसार १५ सप्टेंबर २००३ पर्यंत कलानिधी यांचा कंपनीत एकही हिस्सा नव्हता. पण त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचे काका मुरासोली मारन यांच्या गंभीर आजारादरम्यान कलानिधी यांनी मूळ प्रवर्तकांच्या होल्डिंग्जमध्ये घट करून प्रत्येकी १० रुपयांच्या दर्शनी मूल्यावर स्वतःला शेअर्स वाटप केले, असा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांचा असा दावा आहे की हे कृत्य फसवं असून नियमांचं उल्लंघन आहे. नोटीसमध्ये असंही म्हटलं की, २३ नोव्हेंबर २००३ रोजी मुरासोली मारन यांच्या मृत्यूनंतर फक्त तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वीच समूह कंपन्यांकडून शेअर्स हस्तांतरित करण्यात आले होते. २६ नोव्हेंबर २००३ रोजी कोणत्याही पक्षाला कोणतेही वैध मृत्यू प्रमाणपत्र किंवा कायदेशीर वारसा प्रमाणपत्र उपलब्ध असू शकत नाही, असं दयानिधी मारन यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते हस्तांतरणच फसवं असल्याचं दयानिधी मारन म्हटलं आहे. या बरोबरच दयानिधी यांनी कलानिधी यांच्यावर असाही आरोप केला आहे की सन टीव्हीच्या स्वतःच्या निधीचा वापर करून दयालू अम्मल यांच्याकडून १०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करण्याचा देखील समावेश आहे.
