सरकारकडून अंतिम मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत बसवा अन्यथा…
जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसवण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून सरकारने त्याला मुदत वाढ दिली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंद झालेल्या सर्व वाहनांना आता 15 ऑगस्टपर्यंत नंबरप्लेट बसवता येणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, म्हणजेच HSRP आता बंधनकारक करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासाठी सुरुवातीला 30 जून 2025 ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद संथ असून, अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनांची नोंदणी बाकी असल्याने ही मुदत आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
प्रत्यक्षात, राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने आहेत. सध्या 23 लाख जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आले आहे. 40 लाख वाहन मालकांनी एचएसआरपीसाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली आहे. सुमारे 1.25 कोटी वाहने अजूनही एचएसआरपीच्या कक्षेबाहेर आहेत. एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत नवीन वाहनांवर डीलर्सकडून एचएसआरपी बसवण्यात येत आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे काय?
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही भारत सरकारने वाहनांची सुरक्षा आणि ओळख वाढविण्यासाठी लागू केलेली एक अनिवार्य नंबर प्लेट आहे. HSRP ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे, ज्यावर एक सिरीयल नंबर आणि त्यावर न काढता येणारा लॉक असतो. ही नंबर प्लेट चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षेच्या कारणांसाठी महत्त्वाची आहे. भारतातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे.
