पुण्यातील जुन्नर परिसरात श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र पारधी (वय 40) आणि महाविद्यालयातील अल्पवयीन तरुणीचा मृतदेह दरीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
या दोघांनी दुर्गवाडी कोकणकड्याच्या 1300 फूट खोल दरीत उडी मारुन आयुष्य संपवले होते. प्राथमिक तपासात दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र पारधी आणि जुन्नर येथील कॉलेज विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांनी अशाप्रकारे निर्जनस्थळी आत्महत्या केल्यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढले होते. पोलिसांना या दोघांच्या मृतदेहाजवळून सुसाईड नोट सापडल्या होत्या. त्यामध्ये रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण यांनी आपल्या आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.
रामचंद्र पारधी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागतो. माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिला आहे. पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा.” तर रूपाली खुटाण हिनेदेखील आपल्याला आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
या दोघांच्या सुसाईडच्या आधारे पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोन्ही मृतांच्या नातेवाइकांना बोलावून चौकशी केली जात आहे. तसेच रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पांढरी कार कोकण कड्याच्या परिसरात उभी केली होती. तीन-चार दिवस ही कार तिथेच उभी असल्याने आणि तिथे चपला दिसल्याने ग्रामस्थांना संशय आला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी कड्याच्या खोल दरीत शोध घेतल्यावर रामचंद्र पारधी आणि तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. रामचंद्र पारधी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कार लॉक केली होती. ही कार टोईंग करुन जुन्नर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. ही कार उघडल्यानंतर पोलिसांना त्यामध्ये आणखी काही पुरावे मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रिव्हर्स वॉटरफॉलजवळ सोडल्या चपला, नेमकं काय घडलं ?
रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण या दोघांचे मृतदेह तब्बल 1200 फूट खोल दरीत पडले होते. जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने अत्यंत बिकट परिस्थितीत प्रयत्नांची शर्थ करुन हे मृतदेह दरीतून वर आणले होते. जुन्नरच्या रिव्हर्स वॉटरफॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. यानंतर शोधाशोध केली असता, दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या होत्या. त्यानंतर दरीत शोध घेतल्यावर दोघांचे मृतदेह सापडले होते.
