सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे. मात्र दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण अद्यापही आहेच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (२४ जून ) इस्रायल आणि इराणमद्ये युद्धबंदीची घोषणा केली होती.
परंतु इराणने याला नकार दिला होता. ट्रम्प यांनी दावा केला होता की, इस्रायल आणि इराण दोन्ही देश त्यांच्याकडे युद्धबंदीच्या विनंतीसाठी आले होते. शिवाय त्यांनी दोन्ही देशांना शांती आणि समृद्धीच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले होते. यानंतरही दोन्ही देशांच्या मंगळवारी (२४ जून) दिवसभर एकमेकांवर हल्ले सुरुच होते.
मोसादच्या सहा गुप्तहेरांना अटक
याच दरम्यान इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादविरुद्ध मोठी कारवाई देखील केली होती. यामुळे मोसादला मोठा झटका मिळाला होता. इराणने २४ जून रोजी मोसादच्या ६ गुप्तहेरांना अटक केली होती. त्यांच्यावर सायबर स्पेसद्वारे मोसादला इराणची गुप्त माहिती पाठवल्याचा आरोप इराणने केला होता. याअंतर्गत आज सकाळी इस्रायलसाठी जासूसी करणाऱ्या आणि खामेनींच्या हत्येचा कट रचणाऱ्या तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे.
तीन जणांना फाशीची शिक्षा
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणने यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे, इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्या आणि खामेनींच्या हत्येचा कट रचणाऱ्या तीन जणांना फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. इद्रिस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद ही या तिघांची नावे आहेत. या तिघांनी इराणमध्ये हत्येची उपकरणे आणण्याचा प्रयत्न केला. या गुप्तहेरांना बुधवारी (२५ जून) सकाळी इराणच्या उर्मिा शहरात फाशीची शिक्षा देण्यात आली.
इराणचे उर्मिया हे शहर तुर्कीच्या जवळ आहे. इराणच्या माध्यमांनी निळ्या गणवेशातील या तिन्ही आरोपींचे फोटो देखील प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी देखील इराणने मोसादच्या दोन गुप्तहेरांना फाशीची शिक्षा दिवली होती. इराणने गेल्या काही काळाच इस्रायल आणि मोसादसाठी कार्य करणाऱ्या लोकांना संशयावरुन अटक केली आहे.
१२ दिवसांत ७०० जणांना अटक
१३ जून २०२५ रोजी इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाला होते. इस्रायलने इराणच्या अणु तळांवर आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष केले होते. यानंतरच इराणने इस्रायलविरोधी कारवाई सुरु केली. याअंतर्गत आतापर्यंत इराणने पाच जणांना फाशीच शिक्षा दिली आहे. जवळपास गेले १२ दिवस हे युद्ध सुरु होते. या १२ दिवसात इराणने ७०० लोकांना इस्रायलशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
