मनोज जरांगेंच्या प्लॅनचा राजकीय अर्थ काय ?
लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे महायुतीला मोठा फटका बसला. तर, महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मनोज जरांगेंची भूमिका यामध्ये महत्त्वाची राहिली.
मात्र, विधानसभेला मनोज जरांगेंची जादू चालली नाही. त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले नंतर त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यांनी स्पष्टपणे महाविकास आघाडीला पाठींबा देखील दिला नाही. या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या यशाने मनोज जरांगेंच्या आंदोलन बोथट झाल्याची चर्चा होती. मात्र, मनोज जरांगेंनी आता भावनिक आवाहन करून सगळ्या मराठ्यांना 29 जुलैला आंतरवाली सराटीमध्ये गोळा होण्याचे आवाहन केले आहे.
‘मराठ्यांची लाट काय असते हे स्वतःहून दाखवून द्या. एक दिवसासाठी काम बाजुला फेकून देऊ. गाव खेड्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शहरातील सगळे मराठे येत्या रविवारी 29 जुलैला आंतरवाली सराटीत या. कोणीही घरी राहू नका. शेवटी प्रश्न आहे मराठ्यांचा अस्मितेचा, भविष्याचा. मराठ्यांवर गुलाला फेकायची वेळ आली कोणी मागे राहू नका. दोन महिने झटून राहा. विनंती करतो मनभेद, मतभेद आपल्या समाजासाठी, जातीसाठी बाजुला ठेवा.’, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यात मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्याच तयारीसंदर्भात आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी मराठा समाज बांधवांना आंतरवाली सराटीमध्ये बोलवले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणा मुद्दा हा महायुती सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे या आंदोलनाचे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत.
नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. आणि ऑगस्टपासून मनोज जरांगेंचे आंदोलन सुरू होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीतील पक्ष घेण्याचा प्रयत्न करणार. विशेष करून मनोज जरांगे पाटील यांची मागील आंदोलने पाहिली तर त्यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस हे असतात. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना जरांगेंनी टार्गेट केले होते. आता तर ते मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत. अशा वेळी मराठा आरक्षणाचा रोष हा फडणवीसांच्या विरोधात व्यक्त होण्याची अधिक शक्यता आहे.
जरांगे विरुद्ध फडणवीस सामना
विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण झाले होते. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीत फडणवीसांना टार्गेट करणे आणि मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या, या मनोज जरांगेंच्या मागण्या पुन्हा ओबीस संघटना स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत एकवटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस विरुद्ध मनोज जरांगे असा सामना मराठा आरक्षणाच्या मागणीच्या निमित्ताने झाला तर तो महायुतीमधील मित्रपक्षांना देखील हवाच असणार आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बाजुने मराठा मतदार उभे राहण्याची शक्यता वाढते.
मराठा चेहरा म्हणून कधीकाळी अजित पवार यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, त्यांनी आपली प्रतिमा तशी होऊ दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य आधार हा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा मतदार आहे. मात्र, तेथे देखील भाजपने मोठी मुसंडी मारल्याने जर मराठा मतदार भाजपपासून दूर जात असेल तर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायद्याचेच ठरणार आहे.
मराठा मतदारांना पर्याय काय?
मराठा आरक्षणाचा प्रश्नाची दाहकता ही मराठवाड्यात सर्वाधिक आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात ती तितकी नाही. तर, कोकण विदर्भात मराठा आंदोलनाची जोर दिसून येत नाही. विधानसभेला भाजपच्या मागे मराठा मतदार मोठ्या प्रमाणात उभा राहिल्याचे दिसून आले. भाजपपेक्षाही जिंकूण येणाऱ्या मराठा उमेदवाराला पाठींबा असे मराठा मतदारांचे वर्तन दिसून आले आहे. त्यामुळे दुबळी झालेली महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याकडे मराठा मतदार पर्याय म्हणून पाहू शकेल का? हे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीनंतर दिसून येईलच. पण ज्या प्रकारे भाजप ओबीसींना एकवटून हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करते तसे मराठा समाजाला एकवटण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील पक्षांकडून दिसून येत नाही.
धर्मनिरपेक्षतेचे आणि पुरोगामित्वाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसची मुख्य मतदार ही दलित आणि मुस्लिम मतदारांवरच असल्याचे दिसून येते. मात्र हा मतदार देखील त्यांच्यापासून दूर जात असल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठा मतदार हा काँग्रेसचा मुख्य आधारस्तंभ होता. मात्र, मराठा मतदार शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळला तेव्हापासून काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली. त्यामुळे मराठा मतदारांना मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा आपल्याकडे वळवण्याची संधी काँग्रेसला आसणार आहे.
