दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : आटपाडी तालुक्यात एका मुलीला नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून शिक्षक असलेल्या पालकाने केलेल्या मारहाणीत मुलीचा झालेला मृत्यू खूपच दुदैवी आणि क्लेशदायक आहे.समाजातील खोट्या प्रतिष्ठेसाठी पालक आपल्या मुलांना वेठीस धरतात. आपल्या अपेक्षा मुलांवर लादतात. प्रत्येक पालकाला आज वाटतंय की, माझा पाल्य इंजिनिअर व डॉक्टर झाला पाहिजे. यासाठी पालक मुलांवर लाखो रुपये खर्च करतात. नुसते पैसे खर्च करुन मुले डॉक्टर, इंजिनिअर होत नाहीत. हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
प्रत्येक पाल्य हा वेगळा असतो. प्रत्येकाची बुद्धीमत्ता व कुवत भिन्न असते. तसेच प्रत्येकाची आवडही वेगवेगळी असते.त्यानुसार मुले शिकत असतात. याचा विचार करुन आपल्या इच्छा मुलांवर लादू नयेत. मुलांच्या आवडीचा विचार न करता पालक मुलांवर डॉक्टर इंजिनिअर होण्यासाठी प्रचंड दबाव टाकतात. एक प्रकारे त्यांचा मानसिक छळच करतात. त्याची आवड नसेल, त्याला ते अवघड वाटत असेल तर दुसरा पर्याय निवडावा. त्याच्या मनाचा विचार करुन निर्णय घ्यावा.
डॉक्टर इंजिनिअर झाले तरच आयुष्य यशस्वी झाले असे काही नसते. तुमच्या मनगटात धमक असेल, तर तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झाला तरी पुन्हा नव्याने आपले आयुष्य घडवू शकता. आज लाखो मुले नीट जेईई परीक्षेचा अभ्यास करताना प्रचंड ताण तणाव सहन करतात. सगळीच मुले काही यशस्वी होत नाहीत. म्हणून त्यांना मारहाण करणं हे योग्य नाही आणि मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी खर्च करणं ही पालकांची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यासाठी मुलांना बोलणे चुकीचे आहे. तुझ्यासाठी मी एवढा खर्च करतोय, हे सारखं बोलून मुलांचे मानसिक खच्चीकरण करु नये.
पालक आज आपल्या पाल्याची इतर मुलांशी तुलना करतात. शेजारचा, मित्राचा किंवा नातेवाईकांचा मुलगा नीट आणि जेईई करतोय म्हणून आपल्या मुलाला नीट जेईई करायला लावतात. आपल्या पाल्याला विश्वासात घेत नाहीत. त्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे हे पाहत नाहीत. तुमच्या इच्छेपेक्षा त्याची आवड आणि कुवत, क्षमता बघा. त्याच्याशी संवाद साधा. आयुष्यात त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नीट आणि जेईई शिवाय अन्य पर्याय आहेत ना? विनाकारण त्याची कुवत नसताना मोठे ओझे उचलायला लावण्यात काय अर्थ आहे.
ज्या मुलांसाठी तुम्ही कष्ट करता, त्यांच्यासाठी राबता त्या मुलांना तुमचा मानसिक आधार वाटला पाहिजे. पालक म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं आवश्यक असतं. त्यांना आत्मविश्वास देणं, त्यांचे मनोबल वाढविणं, त्यांना नव्याने उभारी घेण्यासाठी बळ देण्याचं काम पालकांचं असतं.
आज डॉक्टर इंजिनिअर बनण्याच्या स्पर्धेत मुले प्रचंड भरडली जात आहेत. त्यांचे जगणं हरवून जाते. त्यांना थोडीसुद्धा मोकळीक मिळत नाही. प्रचंड ओझ्याखाली दडपली जातात. अशावेळी पालक म्हणून त्यांना समजून घ्या. त्यांच्याशी शांतपणे बोला.त्यांच्या अडचणी जाणून घ्या.त्यांना धीर द्या. त्यांना पुन्हा संधी द्या. नव्याने भरारी घेण्यासाठी. नाहीतर या जगात मुलांपेक्षा मौल्यवान दुसरे आहे तरी काय ? म्हणून मुलांना जपा. त्यांना आनंदी ठेवा. तुमच्या प्रतिष्ठेसाठी त्याचं जगणं हिरावून घेऊ नका.
– डॉ. ज्योती जाधव, वाघोली, पुणे.
