माळेगाव साखर कारखान्यातील वातावरण अजित पवारमय !
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आता निलकंठेश्वर पॅनेल हे पूर्ण बहुमताच्या दिशेने प्रवास करीत आहे. यातील सहकार पॅनलला मोठा धक्का देणारी घटना म्हणजे, आघाडीवर असलेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे हे दुसऱ्या फेरीत पिछाडीवर जाऊन त्यांचा 593 मतांनी पराभव झाला.
हा पराभव सहकार पँनेलसाठी मोठा धक्का आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गेली अनेक वर्ष रंजनकुमार तावरे हे कधी संचालक तर कधी अध्यक्ष राहिलेले आहेत. रंजनकुमार तावरे यांनी काल मतमोजणीच्या दिवशी देखील मतमोजणी सुरू होतानाच जर राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 उमेदवार निवडून आले, तर आपण राजकारण सोडू असे सांगितले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब प्रवर्गातून विजय झाल्यानंतर ते निवडून येणारच होते, मात्र उर्वरित 20 जागांवर आमचेच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला होता. मात्र आता प्रत्यक्षात रंजन तावरे यांचीच जागा धोक्यात आली. रंजनकुमार तावरे यांचा पराभव झाल्याने सहकारी चळवळीतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख वक्ते हे रंजन तावरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत होते. रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्यावर टीका करताना आजारपणाच्या नावाखाली अनेक दिवस हे संचालक मंडळाच्या बैठकीला आलेच नाहीत आणि ते आता मात्र कांगावा करत आहेत, असा आरोप केला होता आणि त्याला शेवटपर्यंत सहकार बचाव पँनेलला समाधानकारक उत्तर देता आले नव्हते.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले आहेत. काल संध्याकाळपर्यंत अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, महिला प्रतिनिधी, भटक्या विमुक्त प्रवर्गातील पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली होती. तर अ वर्ग गटातील उमेदवारांची मतमोजणी सुरू होती. नंतर दुसऱ्या टप्प्यातली मतमोजणी झाली. दरम्यान, या निवडणुकीत अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलला चांगलं यश मिळत असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला जातोय.
