नाशिकच्या उद्धव ठाकरे पक्षाला धक्का देण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महानगर प्रमुख विलास शिंदे यांना शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून थेट आमंत्रण देण्यात आले आहे.
त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला नाशिक मध्ये आणखी एक धक्का बसण्याची चर्चा आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नुकतीच आपल्या समवेत सात ते आठ नगरसेवक भाजप पक्षात येतील असा दावा केला होता. या दहाव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांची संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी नुकतीच आपल्या समर्थकांची मिसळ पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत ओघानेच पक्षांतराची चर्चा झाली. यावेळी भारतीय जनता पक्षात स्थानिक पदाधिकाऱ्यांचे ऐकले जात नाही. त्यामुळे या पक्षात पदाधिकाऱ्यांना प्रतिष्ठा नसल्याने या पक्षात जाऊ नये असे शिंदे यांच्या समर्थकांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.
विलास शिंदे यांच्या कन्यांच्या विवाहाला तसेच अन्य एक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा विलास शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट चर्चेचा विषय ठरली. या निमित्ताने विलास शिंदे यांना शिंदे गटात ओढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे लपून राहिले नाही.
नुकत्याच झालेल्या मिसळ पार्टीत देखील विलास शिंदे यांच्या काही समर्थकांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातच राहावे असे मत व्यक्त केले. काही कार्यकर्त्यांनी मात्र शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करावा. सत्तेच्या माध्यमातून प्रभागाचा विकास करण्यासाठी मदत मिळेल. सध्या अनेकांना शिवसेना शिंदे पक्षाचा मोह पडला आहे, असे सांगितले.
स्वतः विलास शिंदे यांचे भुमिका मात्र अद्यापही तळ्यात मळ्यात आहे. पक्षांतराच्या चर्चेमुळे प्रभागातील नागरिक विचारना करतात. त्यामुळे नागरिकांना खुलासे करताना नाकी नऊ आले आहेत. समर्थक आणि नागरिकांची संवाद साधल्यानंतरच मी भुमिका घेणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे यांच्या या वक्तव्याने वेगळाच संदेश गेला आहे. आतापर्यंत तळ्यात मळ्यात भूमिका घेत कधी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर तर कधी पक्षावर विश्वास व्यक्त करीत शिंदे यांनी पक्षांतर करणार की नाही याचे उत्तर दिले नव्हते. आता मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षांतर करणार असल्याचा संकेत दिला आहे. त्यामुळे लवकरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नाशिक मध्ये आणखी एक धक्का बसण्याचे चिन्ह आहे.
