उद्धव-राज ठाकरेंनी केली कोंडी; अजितदादांचीही विरोधात भूमिका !
हिंदी विरोधात राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे मनोमिलन झाले आहे. ठाकरे बंधु पाच जुलै मोर्चा काढून मराठी माणसाची ताकद दाखवून देणार आहेत. सर्वपक्षीय मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील जाहीर पाठींबा दिला आहे.
मात्र, मराठीच्या मुद्यावर ज्या शिवसेनेचा जन्म झाला आणि ती खरी शिवसेना आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंची मात्र हिंदीच्या मुद्यावरून ठाकरे बंधुंनी चांगली कोंडी केली आहे.
मोर्चाच्या निमित्ताने उद्धव-राज ठाकरे एकत्र येत असताना मुंबईतील मराठी मतदार हा एकनाथ शिंदेपासून दूर जाण्याची शक्यता आहे. कारण पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीचा निर्णय जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असला तरी त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी शालेय शिक्षण खात्याची आहे. आणि हे खातं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असून दादा भुसे हे शिक्षणमंत्री आहेत.
हिंदी भाषेची शिक्षणात पहिलीपासून अंमलबजावणी करण्याबाबतची जबाबदारी शिक्षण खात्यावर असल्याने मराठीच्या मुद्यावर उभा राहिलेली शिवसेना हिंदीचा प्रचार करते म्हणून एकनाथ शिंदेंवर टीका होण्याची शक्यता आहेत. त्यातच हिंदी मतांसाठी भाजपने हा डाव खेळल्याची चर्चा आहे. आणि मुंबई महापालिकेत शिंदेंना भाजपसोबत गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवारांची विरोधात भूमिका
हिंदी पहिलीपासून कशी योग्य आहे, हे सांगत शिंदेंचे मंत्री दादा भुसे व्यग्र आहेत. त्यांनी राज ठाकरेंपुढे त्याविषयी प्रेझेंटेशन केले. मात्र, महायुतीत सत्तेत सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे पहिलापासून हिंदी नको, अशी भूमिका घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबईत फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे या भूमिकेचा त्यांना फटका बसणार नाही. मात्र, अजित पवार भूमिका घेतात एकनाथ शिंदे हिंदीला समर्थन देतात असा संदेश जातो आहे.
माघार घेतली तर क्रेडिट ठाकरे बंधुंना…
आगामी महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेना भाजपशिवाय पर्याय नाहीये. हिंदी भाषिकांना खूश करण्याच्या भाजपच्या खेळीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची सेनेची गोची झाली आहे. त्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांना हिंदीचे समर्थन देखील करावे लागते आहे. आता हिंदीच्या मुद्यावर माघार घेतली तर त्याचे त्याचे क्रेडिट ठाकरे बंधुंना जाई आणि मुद्दा चिघळला तरी त्याचा फटका एकनाथ शिंदेंनी बसेल, अशी दोन्ही बाजुने शिंदेंची कोंडी झाली आहे.
