दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते : – संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सध्या नातेपुते येथे मुक्कामी असून, या पार्श्वभूमीवर नातेपुते नगरपंचायत व स्थानिक प्रशासनाने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी केली आहे.
नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष श्री. अतुल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण पालखी मार्ग आणि परिसर स्वच्छ करण्यात आला असून, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, काटेरी झुडपे व गवत हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पिण्याचे पाणी आणि स्वच्छता:
गावातील पिण्याच्या टाक्या नीट धुतल्या असून, फिल्टरेशन प्लांटमध्ये वाळू बदलण्यात आली आहे. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक विद्युत मोटारींची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. पालखी मुक्कामी दिवशी सलग १२ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी गावात ८ टँकर रिफिलिंग पॉइंट्स उभारण्यात आले आहेत.
स्वच्छता व सुविधा:
वारकऱ्यांच्या सोयीसाठी १२०० शौचालये, फिरती शौचालये, ५० स्नानगृहे, महिलांसाठी चेंजिंग रूम, तसेच आपत्कालीन कक्ष, हिरकणी कक्ष व वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
वीज व पाणीपुरवठा स्वतंत्र:
सोहळ्याच्या दिवशी पालखी तळावर जनरेटरच्या सहाय्याने वीजपुरवठा केला जाणार असून, त्यामुळे पाणीपुरवठाही जनरेटरवर चालणार आहे. यामुळे वीज मंडळावर अवलंबून राहावे लागणार नाही.
कचरा व्यवस्थापन:
गावातील कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केला जाणार असून, वारकऱ्यांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
प्रशासकीय मान्यता:
यंदा प्रथमच नगरविकास विभागाने पालखी मुक्काम व्यवस्थेसाठी ₹१७.५० लाख खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे नगरपंचायतीला वित्तीय पाठबळ मिळाले असून, सेवा व सोयींची अंमलबजावणी अधिक सुलभ झाली आहे.
नातेपुते ग्रामस्थ, प्रशासन आणि नगरपंचायत यांच्या एकत्रित प्रयत्नातून गाव पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण गाव झटत आहे – हीच खरी वारीची पुण्याई!
