दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर हे सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असून गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ एक भव्य सत्कार समारंभ नुकताच निडेबन येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा आमदार आ. संजय बनसोडे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. बनसोडे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करावेत. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार नागरिक आहे. आपण जितके प्रयत्नशील राहू, तितके आपल्या देशाचे भविष्य उज्वल होईल.”
कला, क्रीडा आणि सामाजिक भानाचे उत्तम उदाहरण – रंगकर्मी प्रतिष्ठान
रंगकर्मी प्रतिष्ठानच्या कार्याचा विशेष उल्लेख करत आ. बनसोडे म्हणाले, “या संस्थेने चित्रकला, निबंध स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा अशा अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. केवळ कला गुणांपुरते मर्यादित न राहता वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्रतपासणी अशा सामाजिक उपक्रमांतून प्रतिष्ठानने समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे.”
तसेच, त्यांनी पुढे सांगितले की, “रंगकर्मीने नुकतेच २०२४ चे राज्यस्तरीय लोकसंस्कृती साहित्य संमेलन मोठ्या यशस्वीपणे पार पाडले असून, हे या संस्थेच्या सातत्यपूर्ण सांस्कृतिक कार्याची पावती आहे.”
या कार्यक्रमास लिंकन स्कूलचे संचालक दिलीपकुमार गायकवाड, प्रसिद्ध कवी भारत सातपुते, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, माजी नगरसेवक मनोज पुदाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जॉनीमियाँ, दत्ता पाटील, प्रणिती होळसंबरे, बाळासाहेब मरलापल्ले, ज्ञानेश्वर बडगे, विवेक होळसंबरे हे मान्यवर उपस्थित होते.
रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा. ज्योतीताई मद्देवाड, उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, सचिन शिवशेट्टे, हनमंत केंद्रे, सुनिल हावा, अॅड. महेश मळगे, निता मोरे, वर्षा मुस्कावाड, मनोहर लोहारे, संदीप निडवडे, बाबासाहेब मादळे यांचाही कार्यक्रमात सहभाग होता.
विद्यार्थी व पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद
या गौरव समारंभास उदगीर, जळकोट, सोलापूर, बीड, लातूर आदी भागांतील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सन्मानाचा अभिमान आणि प्रेरणा स्पष्टपणे दिसून येत होती.
—
उदगीरमधील सांस्कृतिक जाणीवा आणि विद्यार्थी घडवणारी संस्था म्हणून रंगकर्मी प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या गौरव समारंभाने विद्यार्थ्यांमध्ये नवे आत्मविश्वासाचे बीज पेरले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे.
