दैनिक चालु वार्ता म्हसळा (रायगड )प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – श्रीवर्धन – गोखले महाविद्यालय, माजी विद्यार्थी सेवा संस्था आणि अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन” निमित्त विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विवेक खरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय तटरक्षक दल, मुरुड-जंजिराचे असिस्टंट कमांडंट श्री. एम. डी. वाहिदुद्दीन, अदानी फाउंडेशनच्या प्रोजेक्ट मॅनेजर सौ. जयश्री काळे, प्रोजेक्ट ऑफिसर श्री. अवधूत पाटील, तसेच श्री. मनीष चौहान या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. नितीनजी सुर्वे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे व समाजहितासाठी सजग भूमिका घ्यावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात श्री. एम. डी. वाहिदुद्दीन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम उलगडून दाखवत विद्यार्थ्यांना या व्यसनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. तर सौ. जयश्री काळे यांनी अदानी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
उपप्राचार्य प्रा. डॉ. विवेक खरे यांनी विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारसरणी अंगीकारून सशक्त आणि सुजाण नागरिक बनावे, तसेच अशा उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःचा विकास साधावा, असे मत मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नवज्योत जावळेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजश्री लोहार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. उल्हास खोपकर यांनी केले. डॉ. निलेश चव्हाण, प्रा. स्वाती शिंदे, प्रा. मृण्मयी भूसाने, प्रा. दाभिलकर मॅडम, प्रा. आरती नेवरेकर, प्रा. वैशाली सावंत, तसेच श्री. सिद्धेश उले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे १०७ विद्यार्थी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
