दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील शासकीय आश्रमशाळेत एक हृदयद्रावक घटना घडली असून, नववीत शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे (रा. दाभाडी वांगणपाडा, ता. डहाणू) या विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (२७ जून) दुपारी ही घटना घडली असून, संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. आश्रमशाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर आणि शिक्षकांच्या कार्यशैलीवर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.पल्लवी खोटरे शुक्रवारी सकाळीच नातेवाईकांसोबत वसतिगृहात परतली होती. दुपारी तब्येत बरी नसल्याचे सांगून तिने वर्गातून वसतिगृहात परतण्याची परवानगी मागितली. दोन विद्यार्थिनी तिच्यासोबत गेल्या, मात्र जेवणाची सुट्टी असताना १ ते २ या वेळेत तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. या वेळी अधीक्षिका निता चुरी ट्रेनिंगसाठी अनुपस्थित होत्या आणि संपूर्ण शाळेत एकही महिला शिक्षिका उपस्थित नसल्याचे उघड झाले. नववीचा वर्ग शिक्षकाविना मोकळा होता. पाच शिक्षकांपैकी केवळ तीनच उपस्थित होते, हे शाळेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे लक्षण मानले जात आहे.
तलासरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पल्लवीच्या आत्महत्येमागे मानसिक तणाव, शैक्षणिक दडपण किंवा कौटुंबिक कारण असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव वाढत असून, त्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता अधिक ठळकपणे पुढे येत आहे.या घटनेमुळे शाळा प्रशासन, मुख्याध्यापक निमचंद राठोर यांच्यावर पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वसतिगृहातील स्वच्छता, आहार, विश्रांती व्यवस्था, महिला कर्मचाऱ्यांचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे गंभीर मुद्दे पालकांनी उपस्थित केले.
“अशा घटनेने पालक वर्गात भीतीचे सावट पसरले आहे. आमच्या मुली सुरक्षित आहेत की नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.”
-एस. के. पाटकर, पालक
“पोलिस तपास सुरू आहे. रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल. शासनाकडे महिला कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली आहे.”
– विशाल खत्री, प्रांत अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, डहाणू
तात्काळ उपायांची गरज!
या घटनेनंतर शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला शिक्षिका आणि समुपदेशन सेवा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अन्यथा, अशा दुर्घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
