राज्यात शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात रोष आहे. यानिमित्त राज्यात सक्तीच्या हिंदीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येत 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.
या मोर्चाची जय्यत तयारी सुरू झाली असून दोन्ही पक्षांकडून जोरदार नियोजन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधीच मराठी कलाकार, क्रीडापटूंनाही यामध्ये सहभागी होण्याचे आव्हान केले होते. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीदेखील मराठी कलाकारांना आवाहन केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हणाले की, “ज्या मराठी भाषेमुळे, प्रेक्षकांमुळे आपण मोठे झालो त्याची आठवण, कृतज्ञता म्हणून सर्वांनी 5 जुलै च्या मोर्चात सहभागी व्हावे. त्यासाठी कृपया 5 जुलैला मराठी मालिका, चित्रपट यांचे शुटींग बंद ठेवावे ही विनंती.” असे म्हणत त्यांनी मराठी कलाकारांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, मनसेकडून बाळा नांदगावकर यांना मोर्चाच्या आयोजनासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून अनिल परब सक्रिय असून वरूण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्या भेटीगाठी होत आहेत. संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांचीही भेट झाली.
दरम्यान, मनसेने हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी फडणवीसांना मराठीचे मारेकरी आणि हिंदीचे सेवेकरी असे म्हटले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत म्हणाले की, “हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो. आमची आज मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यामध्ये आम्ही या विषयावर चर्चा करू, असे त्यांनी म्हटले आहे. कोणतीही आघाडी किंवा युती असेल तर थोडाफार मतप्रवाह वेगळा असू शकतो, पण राज्याच्या हिताचे काय? जनतेच्या हिताचे काय? भवितव्याच्या दृष्टीने काय महत्त्वाचे? हे पाहणे महत्त्वाचे असते. त्यावर चर्चा करायची असते, चर्चेतून मार्ग निघतो. असेही ते पुढे म्हणाले.
