आता चिपळणमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा झटका !
कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि विधानसभेवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीत झालेला पक्ष प्रवेश सध्या वादाचा मुद्दा ठरला आहे.
या प्रवेशावरून एकानाथ शिंदे आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आमने-सामने आली आहे. तर यावरून वाद उफाळून येण्याची शक्यता असतानाच चिपळण येथे आणखी मोठा पक्ष प्रवेश राष्ट्रवादीत झाला आहे. यामुळे वादाची पुन्हा ठिणगी पडली आहे.
अजित यशवंतराव यांच्या प्रवेशावरून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर प्रवेश करून घेताना आम्हाला विचारात घ्या… असाही इशारा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीने शिवसेना पुन्हा एक मोठा धक्का देत आणखी पक्ष प्रवेश रविवारी घडवून आणले आहेत.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रविवारी गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुकाप्रमुख शरद शिगवण यांच्यासह दोन विभागप्रमुख, उपविभागप्रमुखासह आठ शाखाप्रमुख आणि समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
दरम्यान पालकमंत्री उदय सामंता यांनी राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करताना यशवंतराव यांच्या प्रवेशावरून डिवचले होते. तसेच मित्र पक्ष प्रवेश करवून घेताना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसत नाही. किमान आम्हाला याबाबत विचारायला हवं होते. आमच्याशी चर्चा करायाला हवी होती, पण राष्ट्रवादीने चर्चा न करताच परस्पर निर्णय घेतला. पण आता जर कोणी परस्पर निर्णय घेणार असेल तर त्यांना तसे उत्तर दिलं जाईल, असाही इशारा दिला होता.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस उद्योजक प्रशांत यादव यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचेही ते म्हणाले. त्याचवेळी आता राष्ट्रवादीने पालकमंत्री सामंत यांच्याच पक्षात कुरघोडी करत त्यांच्या समर्थकांना प्रवेश दिला आहे. यामुळे आता फोडाफोडीच्या या राजकारणात येत्या काळात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
