मोहन भागवतांची मुस्लीम धर्मगुरूंसोबत बैठक घेताच ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल…
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच हरियाना भवनमध्ये मुस्लिम समाजातील धर्मगुरू, मौलाना आणि विचारवंतांची भेट घेतली. या बैठकीला सत्तरहून अधिक मौलवी आणि मुस्लिम विचारवंत उपस्थित होते.
याच बैठकीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. मोहन भागवत यांनी मुस्लिम विचारवंतांची वेदना आणि भूमिका समजून घेतली. मुसलमान समुदायासोबत संघाने जवळीक साधण्याचा केलेला हा प्रयत्न भाजपमधील बाटग्या हिंदुत्ववाद्यांना रुचेल काय? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
सामनात लिहिलं की, देशात भाजपमधील काही मंडळींकडून जे धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण केले जात आहे, मुस्लिम समाजास लक्ष्य केले जात आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. ही बैठक 3 तास चालली. सरसंघचालकांनी मुस्लिम विचारवंतांची वेदना आणि भूमिका समजून घेतली.
पण मुस्लिमांशी संघाने जवळीक साधण्याचा केलेला हा प्रयत्न भाजपमधील बाटग्या हिंदुत्ववाद्यांना रुचेल काय? उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, दिल्लीतील भाजपमधील नवहिंदुत्ववाद्यांनी अलीकडे हिंदुत्वाच्या नावाने जो हैदोस घातला आहे, त्यांना सरसंघचालकांचे हे पाऊल पटणार नाही.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नवे टिळेधारी नितेश राणे यांना तर भागवत यांच्या भूमिकेमुळे धक्काच बसला असेल व त्यामुळे मंत्री राणे हे राजीनामाच देतील. कारण मुसलमानांच्या बाबतीत त्यांनी गेल्या काही दिवसांत जी गरळ ओकली, ती पाहता सरसंघचालकांची सध्याची भूमिका अशा मंडळींना पटणार नाही, अशा शब्दात नितेश राणेंवर बोचरी टीका केली.
राजकीय स्वार्थ आणि मतांच्या धुवीकरणासाठी मुसलमानांना ‘लक्ष्य’ करून हिंदू समाजाला उचकवायचे व तेढ निर्माण करण्यात, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ यांसारख्या घोषणा विधानसभा निवडणुकांत देऊन हिंदू-मुसलमान अशी दरी निर्माण करण्यात हे लोक पुढे होते, असा निशाणा देखील सामनातून भाजप नेत्यांवर साधण्यात आला आहे.
दरम्यान, भारतात फक्त आम्हीच राहू व इतर धर्मीयांना ‘मत’ देण्याचाही अधिकार नाही हे ठरवून आधी महाराष्ट्रातून व आता बिहारमधून मुसलमान, ख्रिश्चन व दलितांची नावे वगळली जात आहेत. सरसंघचालक भागवत व मुस्लिम विचारवंतांमधील हाच खरा चिंतनाचा विषय असावा.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व देश उभारणीत मुस्लिम समुदायाचा सहभाग महत्त्वाचा होता. मुस्लिमांनी क्रांतीत सहभाग घेतला व हौतात्म्य पत्करले तेव्हा आजचा ‘भाजप’ जन्मास आला नव्हता, असा टोलाही सामनातून लगावला आहे.
