स्वत:च दिली मोठी माहिती…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेत्यांसोबत त्यांचे पटत नसल्याचे सांगण्यात येते.
हे बघता ते कधी भाजपात जाणार तर कधी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असे सातत्याने बोलले जात आहे. मात्र, यास अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.
याचदरम्यान, माजी मंत्री जयंत पाटील शुक्रवारी (ता.25) अचानक दिल्लीला गेले होते. ते भाजपच्या नेत्यांना भेटले असल्याची चर्चा आहे. सायंकाळी नागपूरला आले असता भाजपच्या कुठल्या नेत्यांसोबत भेट झाली असा प्रश्न विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले आणि संपूर्ण दिवसाचा घटनाक्रमच सांगितला.
जयंत पाटील म्हणाले, शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया असोसिएशनचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी दिल्लीला गेलो होतो. त्यानंतर जेवण केले, बसलो आणि विमानतळावरून परत आलो असा सगळा दिनक्रम त्यांनी विषद केला. तुमच्या प्रश्नाचे एवढेच उत्तर माझ्याकडे आहे असे सांगून ते मिश्किलपणे हसले.
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत विचारणा केली असता तुम्ही फक्त अजित पवार यांच्याच मंत्र्याबद्धल प्रश्न विचारता, इतका बायसपणा बरा नाही असे सांगून त्यांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली.
माणिकराव कोकाटे यांचे काय करायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठरवायचे आहे. आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे आम्ही विचार करून काही होणार नाही. वादग्रस्त मंत्र्यांना काढायचे की ठेवायचे हा मुख्यमंत्र्यांचा चॉईस आहे. खांदेपालट करणे म्हणजे मंत्री जे बोलले त्यास मान्यता देणे असा अर्थ होईल. असे असले तरी खांदेपालट केले किंवा खात्यांची अदलाबदली केली तरी स्वभाव बदलत नाही याकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान सरकारचे कामे घेऊ नका असे मी आधीपासूनच कंत्राटदारांना सांगत होते. मात्र आज ना उद्या पैस मिळतील या आशेने कंत्राटदारांनी कामे घेतली. लाखो रुपयांचे कर्ज घेऊन कामे केली. त्यामुळे आता कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले. दिवसाला शंभर शंभर निर्णय घेतले. सरकार गतिमान आहे, असं वाटत होतं. आता त्याची गती काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला कळले असेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
